शनिवार, १७ जानेवारी, २०१५

अभ्यास म्हणजे काय?

अभ्यास करताना उपयुक्त ठरणाऱ्या अभिनव तंत्रांविषयी.. आपल्या प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या अभ्यासाची काही तंत्रं आपण या सदरातून जाणून घेणार आहोत. अभ्यास हा विषयच असा आहे की याचा अभ्यास निरंतर. सुरू आहे. पूर्वीच्या काळी ऋषी-मुनी, गुरूंपासून आजचे वैज्ञानिक, मानसोपचारतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ यावर सतत संशोधन, मनन, चिंतन करत आहेत. ही सारी धडपड आहे यशाचा मार्ग अधिक प्रशस्त होण्यासाठी. 'यश' म्हणजे काय? त्याचे आयाम कोणते, मोजपट्टी कोणती याची परिभाषा कदाचित भिन्न असू शकेल. पण प्रत्येकाला आपण जिथे, जसे आहोत तिथून थोडं उन्नत स्थानी जायचं असतं. सतत काही नवं हवं असतं. आपल्यापैकी प्रत्येकजण आयुष्यभराचा विद्यार्थीच असतो. अगदी इवलासा जीव पृथ्वीवर अवतरल्यापासून जगाचा निरोप घेईपर्यंत. एवढंच काय, औपचारिक व अनौपचारिकरीत्या आपली शिकण्याची धडपड सुरूच असते. एकाचवेळी कितीतरी गोष्टी आपल्याही कळत-नकळत आपण शिकत असतो. आपण काहीतरी ऐकतो, पाहतो, अनुभवतो मग लगेच ती माहिती मेंदूकडे पाठवली जाते. आपला मेंदू अगदी सुपर कॉम्प्युटरपेक्षाही वेगानं कार्य करत असतो. तो ताबडतोब नवी मिळालेली माहिती त्याच्याकडे असलेल्या माहितीशी ताडून बघतो. कधी तुलना करतो, निष्कर्ष काढतो, नियम बनवतो इत्यादी. नको असलेली माहिती बाजूला सारतो. काहीवेळा आपणच त्याला सूचना देतो 'याची गरज नाही' किंवा त्या माहितीचा वापर करत नाही. मग ती माहिती अडगळीच्या सामानासारखी पडून राहते. कायमची पुसली मात्र जात नाही. आण मग वेळ येताच त्या माहितीचा त्या त्या काळ, वेळ, प्रसंगानुसार आपण वापर करतो. ज्याला अचूक वापराचे तंत्र कळले तो परीक्षेत आणि एकूण आयुष्यात यशस्वी होतो. आपल्यापैकी प्रत्येकाला यशस्वी व्हायचं आहे. म्हणूनच ही सारी प्रक्रिया आणि तिचा परिणामकारक वापर आपण जाणून घेऊ या. खरं तर शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एप्रिल-मे पासून हा विषय क्रमवार मांडायला हवा. म्हणजे असे की- * अभ्यास म्हणजे काय? प्रत्येक विषय आपल्या मेंदूच्या, व्यक्तिमत्त्वाच्या कोणत्या पैलूंना आकार देतो? * स्वयंअध्ययन- म्हणजेच स्वत:चा स्वत: अभ्यास कसा करावा? * परीक्षेच्या अभ्यासाबरोबर इतर कोणत्या गोष्टी शिकाव्यात, ज्याचा अभ्यासातही उपयोग होऊ शकेल? * अभ्यासनीती म्हणजे काय? * अभ्यासाच्या चांगल्या सवयी-कोणत्या? त्या कशा लावून घ्याव्यात? चुकीच्या सवयींना रामराम कसा ठोकावा? * पाठांतर, मनन, चिंतन, एकाग्रता, वेळेचे नियोजन, उजळणी या सर्वाना म्हणतात अभ्यासतंत्रे. ती कशी आत्मसात करावी? त्यांचा वापर कसा करावा? * श्रवण, वाचन, संभाषण, लेखन ही झाली अभ्यास कौशल्ये. त्यात अधिक तज्ज्ञता कशी प्राप्त करता येईल? आपल्याकडे ती कितपत आहेत, हे कसे जोखावे? त्यांना अधिक धारदार कसे बनवता येईल? * अभ्यास करताना वा परीक्षा देताना कोणत्या समस्या जाणवतात? त्यांचं निराकरण कसं करता येईल? * या साऱ्या समस्यांना, अडथळ्यांना पार करत अंतिम परीक्षेला कसं सामोर जावं? जेणे करून अधिक ताण न येताही उत्तम यश मिळेल.. आता शाळा, महाविद्यालयातील सारी मौजमजा, स्पर्धा, उत्सव आटोपले आहेत. चोहो बाजूंनी एकच सूचना येते आहे- 'चला अभ्यासाला लागा.' परीक्षा दोन-तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. म्हणूनच पुढच्या भागापासून आपण परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल ते आपण पाहू या. लोकसत्ता मुंबई, Learn इट, बुधवार, १४-०१-२०१५ लेखिकाः अनुराधा गोरे, लिंकः http://www.loksatta.com/learn-it-news/effective-study-techniques-1061103/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा