आज ई-लर्निंगचा बोलबाला आहे. प्राथमिक
शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत इंटरनेट आणि संगणकाचा शिक्षणात वापर वाढताना दिसतो.
तरुणाईच्या हातात विविध कंपन्यांच्या टॅबलेट आणि स्मार्टफोनची मॉडेल्स खेळताहेत.
क्लासरूम टीचिंगपासून ते परीक्षा देणे या सर्वच क्षेत्रांत ई-लर्निंगला मोठाच वाव आहे. स्पर्धा परीक्षाही त्याला अपवाद कशा असतील? आज बँकांच्या परीक्षा ऑनलाइन व्हायला लागल्या आहेत. कदाचित भविष्यात
यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षाही होऊ शकतील. स्पर्धा परीक्षांची तयारी
करण्यासाठी ऑनलाइन ई-लर्निंगसारखे समर्थ साधन नाही.
केंद्रीय किंवा राज्य लोकसेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या
विद्यार्थ्यांसाठी तीन टप्पे फार महत्त्वाचे असतात. पहिल्या टप्प्याच्या तयारीत
शिकणे, दुसऱ्या टप्प्यात उजळणी आणि तिसऱ्या टप्प्यात सराव
करायचा असतो. सरावासाठी मुख्यत: विविध टेस्ट सीरिजचा उपयोग केला जातो. किती सराव
परीक्षा सोडवतो यापेक्षा त्या कशा सोडवतो आणि त्याचे विश्लेषण म्हणजे 'परफॉर्मन्स अॅनॅलिसिस' खूप महत्त्वाचे असते.
प्रत्येक विद्यार्थ्यांला या कामगिरीविषयक विश्लेषणावरून स्वत:ची तयारी कुठवर झाली
आहे, हे लक्षात येते. त्यानुसार तो अभ्यासाचा आशय, पद्धती आणि तंत्रे यामध्ये योग्य तो बदल करत असतो. बऱ्याच जणांना आपल्या
कामगिरीचे विश्लेषण कसे करायचे हे माहीत नसते. ज्यांना माहीत असते त्यांना लागणारा
पुष्कळ वेळ यासाठी वापरावा, असे वाटत नाही. विद्यार्थ्यांची
ही गरज ओळखून ज्ञान प्रबोधिनीच्या संशोधन विभागाने संगणकावरील एक सॉफ्टवेअर विकसित
केले आहे.
www.competeprabodhiniway.com या वेबसाइटवरील हे सॉफ्टवेअर
विद्यार्थ्यांना वापरता येईल. शालेय वयापासून देता येणाऱ्या अनेक स्पर्धा परीक्षा
(एनटीएस, पीएसए, होमी भाभा, एमपीएससी) या संकेतस्थळावर आहेत. त्यापकी जर एमपीएससी हा पर्याय निवडला तर
या परीक्षेसाठी ऑनलाइन मॉक टेस्टला आपण जाऊ शकाल. नोंदणी केल्यानंतर पेपर-१ आणि
पेपर-२ च्या दोन छोटय़ा चाचण्या आपल्याला विनामूल्य देता येतील.
कामगिरीचे
विश्लेषण
या चाचण्या देताना योग्य पर्याय निवडण्याबरोबरच एखादे उत्तर तुम्ही
किती खात्रीने देत आहात असाही पर्याय निवडता येईल. यामुळे 'परफॉर्मन्स
अॅनॅलिसिस'ला मदत होईल. आपल्याला मिळणाऱ्या गुणांचे
विश्लेषण हे विषय-घटकानुसार, वेळेनुसार, काठिण्यपातळीनुसार मिळते. एवढेच नव्हे तर प्रश्नपत्रिका सोडवताना बऱ्याचदा
आपण ती एकाच वेळी सलग सोडवत नाही. ती वेगवेगळ्या फेऱ्यांमध्ये सोडवतो. प्रत्येक
फेरीला लागलेला वेळ, त्यात बरोबर आलेली उत्तरे, चुकलेली उत्तरे हेही कळते. ही सर्व माहिती आलेखांच्या रूपातदेखील
स्क्रीनवर येते. त्यामुळे हे सारे विश्लेषण समजून घेणे सोपे जाते. आपल्या तयारीतील
बलस्थाने आणि कच्चे दुवे संगणक आपल्याला दाखवतो आणि त्याबरोबरच आवश्यक त्या फीडबॅक
कॉमेंट्स स्क्रीनवर येतात. या सूचनांनुसार आपल्याला अभ्यासात काय बदल करायला हवेत
ते समजते. सारेच विश्लेषण प्रश्नानुसारही असते, त्यामुळे
प्रत्येक प्रश्नाचा बारकाईने विचार करता येतो. याशिवाय ही मॉक टेस्ट हजारो मुले
देत असल्याने आपला परफॉर्मन्स इतरांच्या तुलनेत कळण्याची व्यवस्था आहे. ही चाचणी
देणाऱ्या विद्यार्थ्यांचे सरासरी गुण, सर्वोच्च गुण आणि कमीत
कमी गुण हेही कळतात. त्यामुळे मॉक टेस्टमधले आपले सापेक्ष स्थान कळायला मदत होते.
संपर्काची
सुविधा
या सर्व तयारीत तज्ज्ञांची मदत आपल्याला लागत असते. येणाऱ्या अडचणी
ई-मेलद्वारे कळवण्याची व्यवस्था या प्रणालीत आहे. त्याला तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन
करणारी उत्तरे ई-मेलद्वारे पाठवली जातात. परीक्षार्थीकडून येणाऱ्या फीडबॅक्समधून
ही प्रणाली सतत सुधारत जाते हे आणखी एक वैशिष्टय़!
www.competeprabodhiniway.com या वेबसाइटवर जाऊन ज्ञान
प्रबोधिनीच्या या ऑनलाइन मॉकटेस्टचा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त उपयोग करता
येईल.
-विवेक पोंक्षे
कृपया खालील लिंक पहाः
http://www.loksatta.com/career-vrutant-news/state-and-union-public-service-online-practice-examination-1078790/