ढोर समाजाचा इतिहास
लेखक: संजय सोनवणी (Sun, 15/07/2012 - 09:26)
ढोर हा भारतातील एक अत्यल्पसंख्य समाज आहे. हा समाज प्रामुख्यानं महाराष्ट्र, कर्नाटक आणि अल्पांश स्वरुपात गुजरातेत आढळतो. अन्यत्र कातडी कमावणार्या समाजांना वेगवेगळी नावं आहेत. उत्तरेत मोची, चमार वगैरे. ज्या ज्या भागांवर सातवाहनांनी राज्य केलं तिथं तिथं महाराष्ट्री प्राकृत भाषेचा प्रभाव आहे. त्यामुळं त्या भागातल्या जातींची नावं ही महाराष्ट्री प्राकृतावरून पडलेली आहेत. त्यामुळं तिथली जातीनाम वैशिष्टय़ंही वेगळी आहेत, हे आपण अन्य जातीनामांवरुनही पाहू शकतो. अन्य ठिकाणच्या जातीनामांवर त्या-त्या प्रदेशातल्या भाषांचा प्रभाव असला तरी हा समाज मूळचा तसा एकच. चर्मकार समाजही याच समाजातून विशिष्ट कौशल्यांमुळं वेगळा झाला एवढंच!
नामोत्पत्ती
`ढोर’ हा शब्द मुळात जनावरांसाठीचा शब्द नाही आणि अवमानास्पदही नाही, हे महाराष्ट्री प्राकृतावरून स्पष्ट दिसून येतं. हा शब्द मूळचा `डहर’ असा असून त्याचा अर्थ पाणवठे, डोह, तळी यानजिक व्यवसाय करणारे लोक . ढोर समाजाचा पुरातन कातडी कमवायचा व्यवसाय पाहता आणि त्यासाठी विपुल प्रमाणात पाण्याची असलेली गरज पाहता त्यांचा व्यवसाय हा मुबलक पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणीच स्थिरावला असणं साहजिकच आहे. `डह’ हा शब्द पुढं `डोह’ (पाण्याचा) बनला. काळाच्या ओघात `डोहर’चं झालं, `ढोर’. (आजही ग्रामीण भागात डोहाला `डव्ह’ वा `ढव’ असंच संबोधतात.) चरणारी गुरं रानातल्या पाण्याच्या डोहात शिरतात, डुंबतात. म्हणूनच `गुरं-ढोरं’ हा शब्द प्रचलित झाला. त्यातून मग `ढोर’ म्हणजे `जनावरं’ असा चुकीचा अर्थ प्रचलित झाला. ढोर समाजाला हा शब्द अवहेलनात्मक अर्थानं वापरला गेल्याचा समज पुढं अकारण रुढ झाला. पण हे वास्तव नाही. डोहानिकट (वा जलाशयानिकट) व्यवसाय करणारे ते `डोहर’ तथा `ढोर’ होत. या समाजाचं मानवी इतिहासात अत्यंत मोलाचं स्थान आहे. या समाजानं पुरातन काळापासून मानवी जीवन, युद्धशास्त्र, प्रवास आणि एकूणच अर्थव्यवस्थाही समृद्ध करण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. अठराव्या शतकातल्या औद्योगिक क्रांतीपर्यंत या समाजानं कर्तृत्व गाजवलं. पण भारतीय समाजातल्या वैदिक व्यवस्थेनं त्यांच्याबद्दल कृतज्ञ न राहता त्यांनाच अस्पृश्य ठरवत कृतघ्नताच व्यक्त केल्याचं स्पष्ट दिसतं.
प्राचीन इतिहास
भारतात जाती या व्यवसायावरुन पडतात ही परंपरा आपल्याला माहीतच आहे. ढोर समाजाचा व्यवसाय म्हणजे मृत जनावरांच्या कातडय़ावर प्रक्रिया करुन ते टिकाऊ आणि उपयुक्त बनवणं. हा व्यवसाय किती पुरातन आहे? मुळात मानवानं हा शोध कसा लावला हे पाहण्यासाठी आपल्याला इतिहासात डोकावलं पाहिजे. खरं तर हा जगातला पहिला जैव-रसायनी प्रक्रिया उद्योग आहे.
जेव्हा जवळपास दीड लाख वर्षांपूर्वी मानव हा शिकारी होता, भटका होता, नग्न राहत होता, त्या काळात शिकार केलेल्या प्राण्यांच्या कातडय़ाची उपयुक्तता मानवाच्या लक्षात आली. थंडी-पावसापासून रक्षण करण्यासाठी (लज्जा रक्षणासाठी नव्हे. कारण तो विचार तेव्हा मानवाला शिवलाही नव्हता) पांघरण्यासाठी आणि कृत्रिम निवारे बनवण्यासाठी आपण कातडं वापरु शकतो, हे लक्षात आल्यावर मानवानं शिकार केलेल्या प्राण्यांची कातडी जपायला सुरुवात केली. परंतु वातावरणाच्या प्रभावामुळं कातडं फार काळ टिकत नाही हे त्याच्या लक्षात आलं. त्यानंतर माणसानं आपली प्रतिभा कामाला लावली. कातडं टिकवता कसं येईल, यासाठी शोध सुरु केला. सुरुवातीची हजारो वर्षे मानव जनावराचीच चरबी चोळून कातडय़ाला मऊ आणि टिकाऊ ठेवण्याचा प्रयत्न करत होता. त्या काळी विपुल शिकार उपलब्ध असल्यानं कातडय़ाची तशी कमतरताही नव्हती. शिवाय तत्कालीन मानव सतत शिकारीच्या वा चराऊ कुरणांच्या शोधात सतत भटकत असायचा. त्यामुळं प्रक्रिया पद्धती शोधणं किंवा प्रक्रिया करत बसणं, यासाठी त्याच्याकडं वेळ नव्हता. पण मनुष्य शेतीचा शोध लागल्यावर जसा स्थिरावू लागला , शिकार कमी झाल्यानं कातडय़ाचा तुटवडा जाणवू लागला, तेव्हा मात्र प्रक्रिया केली तरच कातडं दीर्घकाळ टिकू शकतं, हे त्याच्या लक्षात आलं.
सरासरी इसवी सनाच्या दहा हजार वर्षांपूर्वी, म्हणजे जेव्हा वैदिक धर्माचा उदयही झाला नव्हता, तेव्हा असंख्य प्रयोग करत मानवानं कातडं कमावण्याची अभिनव पद्धती शोधून काढली. भारतात बाभूळ, खैर अशा झाडांच्या साली, चुना, मीठ आणि अन्य तेलादी द्रव्यं वापरून कातडी कमावण्याची, रंगवण्याची पद्धत इसवी सनापूर्वी सात हजार वर्षांपूर्वी शोधण्यात आली. भारतभर हीच पद्धत वापरली जावू लागली. (युरोपात मात्र ओक वृक्षाची साल कातडी कमावण्यासाठी वापरली जाई. ते कातडं तेवढं टिकाऊही नसे)
कातडी कमावणं हे अत्यंत शिस्तबद्ध, रासायनिक प्रक्रियांची एक विशिष्ट श्रृंखला असलेलं किचकट आणि कष्टदायी काम आहे. आज या उद्योगातल्या अनेक प्रक्रिया यांत्रिकीकरणानं होतात. तरीही प्र प्रक्रिया यांत्रिकीकरणानं होतात. तरीही प्राथमिक प्रक्रिया या मानवी श्रम-सहभागाशिवाय होत नाहीत. प्राचीन काळचा विचार केला तर एका वेळी रासायनिक प्रक्रिया वारंवार क्रमानं करण्याची, रासायनिक प्रक्रियांसाठी लागणारी नैसर्गिक जैव सामग्री गोळा करण्याची आणि अंततः त्याला अंतिम उत्पादनाचं रुप देण्याची कारागिरी करायला किती सायास पडत असतील, याची आपण कल्पना करुनच थक्क होतो.
आता इथं प्रश्न विचारला जावू शकतो की, मुळात ही यातायात का? एक तर जनावराचं कातडं सोलून काढलं की ते वाहून आपल्या उद्योगस्थळापर्यंत आणण्याचा, स्वच्छ करण्याचा, किळसवाणा वाटणारा उपद्व्याप..मग एवढय़ा रासायनिक प्रक्रिया करताना येणारा उग्र आणि घाणेरडा वास, चुन्याची-मीठाची प्रक्रिया करताना हाता-पायांवर होणारे परिणाम, हे सारं माणूस सहन करत का केला? याचं महत्वाचं कारण म्हणजे मानवी समाजाची कातडी वस्तूंची निर्माण झालेली अपरिहार्य गरज. त्यामुळंच या व्यवसायात पूर्वी प्रचंड सुबत्ताही होती. समाजात हजार वर्षांपूर्वीपर्यंत सन्मानही होता. ऋग्वेदात चर्मकारांबद्दल आदरार्थीच उल्लेख मिळतात.
कातडीवर प्रक्रिया करताना येणारी दुर्गंधी आणि जलाशयाजवळ राहण्याची गरज यातून हा समाज वेशीच्या बाहेर राहिला. पण त्यांच्या या अपरिहार्यतेचा गैरफायदा समाजानं घेतला आणि त्यांना अस्पृश्यच ठरवून टाकलं. खरं तर या व्यवसायाखेरीज मानवी जीवन सुसह्य होऊच शकत नव्हतं. चर्मप्रक्रिया करणार्या समाजाला जगभरात कुठंही अमानवी वागणूक दिल्याचं उदाहरण आढळत नाही. भारतात मात्र हा विकृत प्रकार झाला.
समाजाला योगदान
कातडी कमावल्यामुळं पादत्राणं, घोडय़ांचं जीन, लगाम, बैलगाडय़ांसाठी बैलांच्या टिकाऊ आणि मजबूत वाद्या बनवता आल्या. सैनिकांसाठी शिरस्त्राणं, हस्त-बचावक, चामडी चिलखतं, ढाली बनवता येऊ लागल्या. त्यातून युद्धतंत्रात मोठा बदल झाला. लिखित संदेश पाठवण्यासाठी आणि अगदी ग्रंथ लेखनासाठीही चामडय़ाचा वापर होवू शकला. (अशा हजारो चामडय़ावर लिहिलेल्या ज्यूंच्या धार्मिक लेखनाच्या गुंडाळ्या तेल अमार्ना इथं सापडल्यात) एके काळी तर चामडय़ाचे तुकडे चलन म्हणूनही वापरात होते. शेतीसाठीची अनेक अवजारं ते जलस्त्रोतासाठी लागणार्या `मोटा’ चामडय़ापासून बनू लागल्या. त्यामुळं शेती उत्पन्न वाढू लागलं. ग्रंथांच्या बांधणीतही कातडय़ाचा उपयोग अगदी अलीकडच्या काळापर्यंत केला जात असे. पाण्याच्या पखाली, तेलाचे, मद्याचे बुधले (ढोर समाजात यातही स्पेशालिस्ट असणारी पोटजात आहे. तिला बुधलेकरी म्हणतात) कमावलेल्या चामडय़ापासूनच बनत होते. गृहसजावटीतही विविध प्राण्यांच्या चामडी वस्तूंना प्राधान्य मिळालं. अगदी अलिकडच्या फॅशनमध्येही कातडी वस्तूंना प्रचंड मागणी असते. थोडक्यात चर्मोद्योगानं मानवी जीवन सुसह्य आणि उच्चभ्रू बनवण्यात मोलाचा हातभार लावला.
पण या चर्मवस्तूंचा सर्रास उपयोग करणार्यांनी त्या बनवणार्यांना मात्र अस्पृश्य ठरवलं. मेलेल्या जनावराच्या चामडय़ाची पादत्राणं वापरताना, मंदिरात वा संगीतात रममाण होताना चर्मवाद्यांचाच वापर करताना, अश्वारोहण करताना चामडय़ाच्या वाद्या हातात धरताना, चामडय़ाचे कंबरपट्टे वापरताना, कातडय़ाच्या पखालींतलं पाणी पिताना किंवा चामडय़ाच्या बुधल्यांतलं तेल खाण्यात वापरताना त्यांना कोणतीही शरम वाटली नाही!
असा हा समाज आद्य जैव-रसायनी प्रक्रियेचा मोलाचा शोध लावणारा, भारतीय अर्थव्यवस्थेला पुरातन काळापासून हातभार लावणारा समाज आहे. उदाहरणार्थ सिंधू संस्कृतीतून निर्यात होणार्या मालात मीठ आणि कातडी वस्तूंचं आणि नंतर मणी-अलंकारांचं फार मोठं प्रमाण होतं. ढोर समाजातूनच चर्मकार समाजाची उत्पत्ती झालेली आहे, हे महाराष्ट्रीय समाजेतिहासावरुन स्पष्ट दिसून येतं. आजही प्रक्रिया केलेली कातडी निर्यात करणारा भारत हा जगातला तिसर्या क्रमांकाचा देश आहे. फक्त आता या उद्योगात कमी दिसतो तो ढोर समाज. कारण त्याच्याकडं या व्यवसायासाठी भांडवलच नाही!
1857 पासून याही क्षेत्रात जसं औद्योगिकरण आलं, तसा ढोर समाज या व्यवसायापासून दूर फेकला जावू लागला. त्यामुळं या स्थानिक कुटीरोद्योगावर अवकळा येऊ लागली. शिवाय स्वातंत्र्योत्तर काळात भान आलेल्या पिढीनं हा व्यवसाय नाकारायला सुरुवात केली. इतर रोजगार शोधू लागली.
मुळात हा समाज पुरेपूर शैव. यांच्यात मातृसत्ता पद्धत सर्रास. या समाजावर ककय्या या महान वीरशैव संताचा फार मोठा प्रभाव आहे. या समाजातले महाराष्ट्रातले असंख्य लोक स्वतःला ककय्या म्हणवून घेतात. किंबहुना हीच फार मोठी पोटजात बनलेली आहे.
या मूळ डहर (ढोर) शैवजनांची लोकसंख्या भारतात 2001 च्या जनगणनेनुसार सुमारे 82 हजार होती. आता ती सव्वा ते दीड लाख एवढी असेल. या समाजातून आता अनेक विद्वान, शास्त्रज्ञ, संगणक तज्ञ पुढं येऊ लागलेत. राजकारणात म्हणावं तर सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या कन्या प्रसिद्धच आहेत. पाय चपला, बूट घालणार्या, स्टेटस म्हणून ओरिजनल चामडी वस्तूंचा सोस बाळगणार्या आपल्यासारख्या व्हाईटकॉलर माणसांनीही आपल्यावरचे पुरातन काळापासुनचे `डहर’ उर्फ `ढोर’ समाजाचे उपकार विसरू नये...एवढेच...