शनिवार, १७ जानेवारी, २०१५

अभ्यास म्हणजे काय?

अभ्यास करताना उपयुक्त ठरणाऱ्या अभिनव तंत्रांविषयी.. आपल्या प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या अभ्यासाची काही तंत्रं आपण या सदरातून जाणून घेणार आहोत. अभ्यास हा विषयच असा आहे की याचा अभ्यास निरंतर. सुरू आहे. पूर्वीच्या काळी ऋषी-मुनी, गुरूंपासून आजचे वैज्ञानिक, मानसोपचारतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ यावर सतत संशोधन, मनन, चिंतन करत आहेत. ही सारी धडपड आहे यशाचा मार्ग अधिक प्रशस्त होण्यासाठी. 'यश' म्हणजे काय? त्याचे आयाम कोणते, मोजपट्टी कोणती याची परिभाषा कदाचित भिन्न असू शकेल. पण प्रत्येकाला आपण जिथे, जसे आहोत तिथून थोडं उन्नत स्थानी जायचं असतं. सतत काही नवं हवं असतं. आपल्यापैकी प्रत्येकजण आयुष्यभराचा विद्यार्थीच असतो. अगदी इवलासा जीव पृथ्वीवर अवतरल्यापासून जगाचा निरोप घेईपर्यंत. एवढंच काय, औपचारिक व अनौपचारिकरीत्या आपली शिकण्याची धडपड सुरूच असते. एकाचवेळी कितीतरी गोष्टी आपल्याही कळत-नकळत आपण शिकत असतो. आपण काहीतरी ऐकतो, पाहतो, अनुभवतो मग लगेच ती माहिती मेंदूकडे पाठवली जाते. आपला मेंदू अगदी सुपर कॉम्प्युटरपेक्षाही वेगानं कार्य करत असतो. तो ताबडतोब नवी मिळालेली माहिती त्याच्याकडे असलेल्या माहितीशी ताडून बघतो. कधी तुलना करतो, निष्कर्ष काढतो, नियम बनवतो इत्यादी. नको असलेली माहिती बाजूला सारतो. काहीवेळा आपणच त्याला सूचना देतो 'याची गरज नाही' किंवा त्या माहितीचा वापर करत नाही. मग ती माहिती अडगळीच्या सामानासारखी पडून राहते. कायमची पुसली मात्र जात नाही. आण मग वेळ येताच त्या माहितीचा त्या त्या काळ, वेळ, प्रसंगानुसार आपण वापर करतो. ज्याला अचूक वापराचे तंत्र कळले तो परीक्षेत आणि एकूण आयुष्यात यशस्वी होतो. आपल्यापैकी प्रत्येकाला यशस्वी व्हायचं आहे. म्हणूनच ही सारी प्रक्रिया आणि तिचा परिणामकारक वापर आपण जाणून घेऊ या. खरं तर शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एप्रिल-मे पासून हा विषय क्रमवार मांडायला हवा. म्हणजे असे की- * अभ्यास म्हणजे काय? प्रत्येक विषय आपल्या मेंदूच्या, व्यक्तिमत्त्वाच्या कोणत्या पैलूंना आकार देतो? * स्वयंअध्ययन- म्हणजेच स्वत:चा स्वत: अभ्यास कसा करावा? * परीक्षेच्या अभ्यासाबरोबर इतर कोणत्या गोष्टी शिकाव्यात, ज्याचा अभ्यासातही उपयोग होऊ शकेल? * अभ्यासनीती म्हणजे काय? * अभ्यासाच्या चांगल्या सवयी-कोणत्या? त्या कशा लावून घ्याव्यात? चुकीच्या सवयींना रामराम कसा ठोकावा? * पाठांतर, मनन, चिंतन, एकाग्रता, वेळेचे नियोजन, उजळणी या सर्वाना म्हणतात अभ्यासतंत्रे. ती कशी आत्मसात करावी? त्यांचा वापर कसा करावा? * श्रवण, वाचन, संभाषण, लेखन ही झाली अभ्यास कौशल्ये. त्यात अधिक तज्ज्ञता कशी प्राप्त करता येईल? आपल्याकडे ती कितपत आहेत, हे कसे जोखावे? त्यांना अधिक धारदार कसे बनवता येईल? * अभ्यास करताना वा परीक्षा देताना कोणत्या समस्या जाणवतात? त्यांचं निराकरण कसं करता येईल? * या साऱ्या समस्यांना, अडथळ्यांना पार करत अंतिम परीक्षेला कसं सामोर जावं? जेणे करून अधिक ताण न येताही उत्तम यश मिळेल.. आता शाळा, महाविद्यालयातील सारी मौजमजा, स्पर्धा, उत्सव आटोपले आहेत. चोहो बाजूंनी एकच सूचना येते आहे- 'चला अभ्यासाला लागा.' परीक्षा दोन-तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. म्हणूनच पुढच्या भागापासून आपण परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल ते आपण पाहू या. लोकसत्ता मुंबई, Learn इट, बुधवार, १४-०१-२०१५ लेखिकाः अनुराधा गोरे, लिंकः http://www.loksatta.com/learn-it-news/effective-study-techniques-1061103/

अस्खलित इंग्रजी यावे, म्हणून..

जागतिकीकरणाच्या युगात उत्तम इंग्रजी बोलता येणे महत्त्वाचेच नव्हे तर अपरिहार्य बनले आहे. इंग्रजीतून उत्तम संभाषण करता येणं आणि इंग्रजी लेखनकौशल्यात पारंगत असणं आज करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे.. तसे म्हटले तर आपण सगळेच इंग्रजी भाषेशी परिचित आहोत. दैनंदिन कार्यालयीन कामकाजातही आपण इंग्रजी वापरतो. आपल्यापकी अनेकांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा-महाविद्यालयांतून शिक्षणही घेतलेले असेल. तरीही आयत्या वेळी इंग्रजीत संभाषण किंवा प्रेझेंटेशन करायची वेळ आली तर आपण कचरतो. इंग्रजीमधून आपले विचार नीट मांडता येतील का? चपखल शब्द सुचतील का? अशा शंका मनात डोकावतात. या भीतीवर मात करण्यासाठी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व संपादन करणे आवश्यक आहे.भाषिक अडचणीमुळे एखादी व्यक्ती अडखळत किंवा विचार करत बोलते. ऐकणाऱ्याचा असा समज होऊ शकतो की बोलणाऱ्या व्यक्तीला विषयाची आवश्यक तितकी माहिती नसल्यामुळे ती अडखळतेय. भाषेवर प्रभुत्व प्राप्त केले, की आपल्या कार्यक्षमतेविषयीचे असे गरसमज टाळता येतात. मातृभाषेइतकेच सहज इंग्रजीतून बोलता आले पाहिजे. कोणतीही पूर्वतयारी किंवा जुळवाजुळव केल्याशिवाय उत्तम संभाषण करण्याएवढी भाषेवर पकड असायला हवी. ही प्रक्रिया थोडी कठीण वाटणे स्वाभाविक आहे. पण चिकाटीने रोज सराव केल्यास इंग्रजी भाषाकौशल्य नक्की सुधारता येते. इंग्रजी संभाषण सुधारण्यासाठी रोज करता येण्याजोग्या काही गोष्टी- भाषेच्या सतत संपर्कात राहा एखाद्या भाषेच्या सतत व अधिकाधिक संपर्कात राहिले की ती शिकणे अधिक सोपे बनते. पण आपण नेमके उलट वागतो. सहसा आपण कठीण वाटणारी गोष्ट टाळतो. इंग्रजी भाषेच्या सतत सहवासात राहा. दिवसभर इंग्रजी कानावर पडू द्या. इंग्रजी वृत्तपत्रे वाचा, इंग्रजी गाणी ऐका, चांगल्या इंग्रजी मालिका व चित्रपट पाहा. जितकी भाषेशी अधिक ओळख होईल, तितक्या लवकर तिच्याशी घनिष्ठ मत्री जमेल. लेखन 'दिसामाजी काहीतरी ते लिहावे' याप्रमाणे रोज निदान चार-पाच ओळी तरी इंग्रजीमध्ये लिहा, मग ती कामांची यादी असो, फेसबुक अपडेट असो अथवा सहकाऱ्याकरिता ठेवलेला एखादा निरोप. इंग्रजीमध्ये डायरी किंवा ब्लॉग लिहा. लिहिताना व्यवस्थित विचार करून वाक्यरचना करता येते आणि मग सरावाने ती बोलण्यातही उतरते. आत्मविश्वास बाळगा भाषा शिकताना चुका होणारच. अशा चुकांमुळे इंग्रजी बोलण्याचे सोडून मात्र देऊ नका. 'इंग्लिश विंग्लिश'मधील अमिताभच्या पात्राने दिलेला कानमंत्र लक्षात ठेवा- 'बेशक बेफिकर बिनधास्त इंग्रजी बोला.' सर्वात महत्त्वाचे म्हणजे इंग्रजी एन्जॉय करा. नवीन भाषा शिकताना आपल्याला मिळतात नवे अनुभव, नवे विचार, एक नवी संस्कृती.. या नवीन दृष्टिकोनाचा आनंद घ्या. मग भाषा आत्मसात करणे एक कंटाळवाणा अभ्यास न राहता एक रसरशीत जिवंत अनुभव होईल. वाचन वाढवा शब्दसंपत्ती वाढावी, यासाठी आपण शब्दकोश उघडतो तर व्याकरणासाठी नियमावलीचा आधार घेतो. असे केल्यास इंग्रजी क्लिष्ट व असाध्य वाटू लागते. या दोन्हींसाठी सोपा मार्ग आहे वाचन. उत्तम इंग्रजी पुस्तके व लेख वाचल्यास उत्तम दर्जाची भाषा आत्मसात व्हायला मदत होते. मात्र, इंग्रजी पुस्तके वाचताना भाषेकडे विशेष लक्ष द्यायला हवे. लेखकाने वापरलेले शब्द आणि वाक्यांची रचना लक्षात घ्या. चांगले शब्द / वाक्ये अधोरेखित करून पुन: पुन्हा वाचा. ती लक्षात ठेवून रोजच्या संभाषणात वापरण्याचा प्रयत्न करा. उदा. ‘I don’t think so.’ च्या ऐवजी I have a different opinion on this issue. वापरल्यास ते अधिक प्रभावी वाटेल. तसेच Wait a minute, I will answer you पेक्षा Could you put that question on hold for a minute?l म्हणणे सयुक्तिक ठरेल. वेळेअभावी आपण पुस्तके / वृत्तपत्रे वाचण्याचा कंटाळा करतो. इंटरनेट व मोबाइल फोन क्रांतीने ही तक्रारही नष्ट केली आहे. केव्हाही कुठेही थोडासा वेळ मिळाल्यास वाचन करणे सहज शक्य झाले आहे. चांगल्या नियतकालिकांच्या वेबसाइट्स तसेच विविध विषयांवरचे ब्लॉग्ज क्षणार्धात शोधता येतात. बसस्टॉपवरील १५ मिनिटे किंवा मीटिंग रद्द झाल्यामुळे मिळालेला अर्धा तास आता इंग्रजी वाचून सहज सत्कारणी लावता येईल.आपल्या क्षेत्राशी संबंधित लेख / ब्लॉग्ज वाचून भाषा तर सुधारतेच, त्याबरोबर व्यवसायातील नवीन घडामोडींची माहितीदेखील मिळते. ऐका व बोला चांगले इंग्रजी ऐका. उच्चारांकडे तसेच आवाजाच्या चढ-उताराकडे विशेष लक्ष द्या. स्वत: बोलताना या शैलीची नक्कल करण्याचा प्रयत्न करा. NatGeo किंवा History Channel वरच्या माहितीपटांचे निवेदन नियमित ऐका. इंटरनेटद्वारे विविध विषयांवर podcasts प्रसारित केले जातात. हे रेडिओसारखे केव्हाही ऐकता येतात. अधिकाधिक लोकांशी इंग्रजीमध्ये बोला. सुरुवातीला कधी योग्य शब्द सापडणार नाहीत तर कधी व्याकरणाच्या चुका होतील. तरीही इंग्रजी बोलत राहा. सतत सराव केल्याने आत्मविश्वास वाढेल व बोलणे अधिक सहज होईल. इंग्रजी बोलताना इंग्रजीमध्येच विचार करण्याचा प्रयत्न करा. अनेकदा आपण मराठीत वाक्य योजून त्याचे शब्दश: भाषांतर करतो. मग She is angry WITH me ऐवजी आपण She is angry ON me म्हणतो तर कधी उंल्ल Can you click a photo of us? च्या जागी Can you remove a photo of us? वापरतो. दोन्ही भाषांची वाक्यरचना वेगळी असल्याने अर्थाचा गोंधळ निर्माण होऊ शकतो. शब्दसंपत्ती वाढवा 'अस्खलित संभाषण करण्यासाठी सर्वप्रथम योग्य शब्द माहिती असायला हवेत. याकरिता शब्दसंपत्ती वाढवली पाहिजे. इंग्लिशमध्ये दीड लाखांहून अधिक शब्द आहेत व दर वर्षी काही नवीन शब्द भाषेत समाविष्ट केले जातात. आपण मात्र आपली शब्दसंपत्ती वाढवताना आपल्या करिअरच्या गरजेवर लक्ष केंद्रित करावे. आपल्या क्षेत्रात नेहमी वापरायला आवश्यक असे अधिकाधिक शब्द आत्मसात करावेत. 'अनेकदा दोन शब्द एकसारखे असल्याने गोंधळ निर्माण करतात. उदा.Respective (अनुक्रमे) व Respected (आदरणीय) किंवा Accept (स्वीकारणे) व Except (वगळता) अशा शब्दांच्या योग्य वापराकडे विशेष लक्ष द्या. 'रोज किमान पाच नवीन शब्द शिका. त्यांचा अर्थ समजावून घ्या व ते वाक्यात वापरण्याचा प्रयत्न करा. केवळ शब्द व अर्थाचे पाठांतर फारसे उपयोगी पडत नाही. 'फ्लॅशकार्ड्स वापरल्यास नवीन शब्द शिकणे खूप सोपे होऊन जाते. हल्ली तर ही फ्लॅशकार्ड्स ंस्र्स्र् च्या स्वरूपातही उपलब्ध आहेत. काही apps मोबाइल फोन / लॅपटॉपच्या screensaver वर नवीन शब्द अर्थासहित दाखवत राहतात. कळत-नकळत हे शब्द आपल्या ओळखीचे होऊन जातात. Visual Thesaurus हे नवीन शब्द शिकण्यासाठी एक सोपे Word games किंवा शाब्दिक खेळांचे अनेक apps मोबाइल फोनवर मोफत उपलब्ध आहेत. फावल्या वेळात कॅण्डी क्रशच्या स्कोअरबरोबरच शब्दसंपत्ती वाढवायला काहीच हरकत नाही. इंग्लिशमध्ये प्रत्येक बारीकसारीक अर्थासाठी चपखल योजता येतील असे अनेक शब्द आहेत, मात्र ते वापरात आणले पाहिजेत. एखादे गाणे, एखादी डिश किंवा एखादा गमतीदार किस्सा आवडला की आपण पटकन Awesome अशी प्रतिक्रिया देतो. गाण्याला delicious व गमतीला humorous म्हणून पाहा, चपखल शब्द वापरण्याची मजा काही औरच आहे. लोकसत्ता मुंबई, Learn इट, बुधवार, १४-०१-२०१५ लेखिकाः गायत्री गाडगीळ विभागप्रमुख, इंग्रजी विभाग, डी. जी. रूपारेल महाविद्यालय, माटुंगा लिंकः http://www.loksatta.com/learn-it-news/how-to-speak-fluent-english-1061108/

असुरक्षेचं चक्र भेदायचंय.. प्रत्येक स्त्रीने वाचुन आमलात आणलात आणावी अशी अतिशय महत्वपुर्ण माहिती

असुरक्षेचं चक्र भेदायचंय.. प्रत्येक स्त्रीने वाचुन आमलात आणलात आणावी अशी अतिशय महत्वपुर्ण माहिती स्त्रीचं पुढे जात राहणं आता अपरिहार्य आहे. पण या मार्गावर विकृती, हिंसा, शोषण दबा धरून बसलेले आहेत. त्या सगळ्यातून वाचत, वाचवत आपला मार्ग सुकर करायचा असेल तर प्रत्येक तरुणीने, स्त्रीनेच खंबीर, सजग व्हायला हवं. पोलिसांच्या यंत्रणांचा यथायोग्य वापर करीत स्वत:ला सुसज्ज बनवत तिने स्वत:भोवतीचं असुरक्षेचं चक्र भेदायचं आहे. नव्या वर्षांत हा संकल्प करायलाच हवा. स्वत:साठी आणि स्त्रीवर्गासाठीही.. घरबसल्या अशी करावी तक्रार प्रत्येक शहराच्या पोलिसांच्या स्वतंत्र वेबसाइट्स (संकेतस्थळे) आहेत. त्यावर सर्वाचे ई-मेल्स, फोन नंबर्स असतात, तक्रारीचा अर्ज असतो. पण कोणीही त्या मुद्दाम शोधून काढायच्या भानगडीत सहसा पडत नाही आणि या सुविधेपासून आपण वंचित राहतो. अशी संकेतस्थळे शोधणे कठीण नाही. उदाहरण द्यायचे झाले तर समजा, आपल्याला मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावर जायचे आहे, मग ते शोधायचे कसे.. ही पद्धत अतिशय सोपी आहे. गुगल सर्चवर जाऊन मुंबई पोलीस (mumbaipolice ) असे टाइप केले की मुंबई पोलिसांचे अधिकृत संकेतस्थळ समोर येईल. अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या शहराच्या, जिल्ह्य़ातील पोलिसांचे संकेतस्थळ शोधू शकता. या संकेतस्थळावर पोलीस महासंचालकांपासून त्या त्या शहरातील पोलीस आयुक्त, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे क्रमांक आणि ई-मेल दिलेले असतात. या ई-मेलवर काही पाठवले तर कोण दखल घेणार, कोण वाचणार, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. एक छोटेसे उदाहरण. काही महिन्यांपूर्वी मुंबईतल्या एका तरुणाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. त्याने मी जीवनाला कंटाळलोय, आत्महत्या करतोय असा मेल मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पाठवला. घरात बसल्या बसल्या त्याने मुंबई पोलिसांचे संकेतस्थळ उघडले आणि आयुक्तांना मेल केला. मित्रांना कळवलं तर ते मन परावृत्त करायला येतील, अशी त्याला भीती होती. पण हा मेल पोलीस आयुक्तांनी वाचला. त्वरित सायबर सेल विभागाला या तरुणाला शोधून त्याला थांबविण्याचे आदेश दिले. काही तासांतच पोलीस त्याच्या घरात पोहोचले आणि त्याला आत्महत्येपासून रोखले. अलीकडे स्त्रियांना भेडसावणारा त्रास सायबरसंबंधातील गुन्ह्य़ांचा असतो. इंटरनेटवर अश्लील फोटो बनवून टाकणं, अनोळखी मोबाइल क्रमांकातून अश्लील मेसेजेस पाठवणं, असे अनेक प्रकार केले जातात. हे सर्व प्रकार सायबर गुन्ह्य़ात मोडतात. त्यामुळे अशा तक्रारी सायबर पोलिसांकडे कराव्यात. मुंबईत वांद्रे येथील बीकेसीमध्ये स्वतंत्र सायबर सेल पोलीस ठाणे आहे, तर पोलीस आयुक्तांच्या मुख्यालयात (क्रॉफर्ड मार्केट) गुन्हे शाखेची सायबर सेल शाखा आहे. याशिवाय आपण त्या त्या ठिकाणच्या प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर गुन्ह्य़ासंबंधातील तक्रारी नोंदवू शकतोच. एकटय़ाने प्रवास करणाऱ्या स्त्रियांसाठी मुंबई पोलिसांनी ९९६९ ७७७ ८८८ ही एसएमएस सेवा सुरू केली आहे. टॅक्सी, रिक्षात बसल्यावर त्या वाहनाचा क्रमांक या मोबाइल नंबरवर फक्त एसएमएस करायचा. हा मोबाइल जीपीएस प्रणालीवर काम करतो. जेणेकरून तुमच्या प्रवासस्थानाची नियंत्रण कक्षात नोंद राहते. रात्रीच्या वेळी टॅक्सी-रिक्षा पकडताना स्थानकाबाहेरच्या स्टँडवरूनच पकडावी. मुंबईतल्या प्रमुख रेल्वे स्थानकाच्या बाहेर रात्री बारानंतर टॅक्सी, रिक्षात बसणाऱ्या प्रत्येक स्त्रीची नोंद ठेवली जाते. टॅक्सीप्रवासादरम्यान कुठलीही तक्रार नोंदवण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांच्या ०२२-२४९३९७१७ या नियंत्रण कक्षातील क्रमांकावर किंवा ८८७९ २२ ११०० या हेल्पलाइनवर संपर्क करावा. जेणेकरून त्यावर भाडे नाकारणे किंवा इतर कारवाई होऊ शकते. आपल्या आजूबाजूला, किंवा ट्रेनमध्येही असं काही चित्रण होत नाही ना, यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. असं कुणी आढळल्यास त्याची तक्रार तुम्ही रेल्वे पोलिसांकडे करू शकता किंवा हेल्पलाइन वर संपर्क साधू शकता.) (GRP -९६६२५००५०० RPF ९००३१६१७०) स्त्रियांना कुठल्याही प्रकारणी तक्रार करायची असल्यास १०० (राज्यात सर्वत्र)आणि १०३ (फक्त मुंबईपुरता)हे दोन हेल्पलाइन क्रमांक आहेत. संकटकाळी या क्रमांकांवर संपर्क केल्यास अवघ्या ५ ते १० मिनिटांत मदत पोहोचू शकते. हे झालं आपत्कालीन परिस्थितीत. पण जर एखाद्या गुन्ह्य़ाची तक्रार करायची असेल तर आता पोलीस ठाण्यातही जायची गरज नाही. एक फोन केला तरी महिला पोलीस (साध्या वेषात) घरी येऊन तक्रार नोंदवून घेतात. जर आपल्या सभोवताली एखादा गैरप्रकार सुरू असेल त्याची माहिती द्यायची असेल आणि आपलं नाव गुप्त ठेवायचं असेल तर ७७३८ १३३ १३३ किंवा ७७३८ १४४ १४४ या क्रमांकांवर फक्त एसएमएस करायचा. प्रत्येकीच्या हातात मोबाइल फोन, स्मार्टफोन असतो. त्यात हजारो क्रमांक असतात. त्यात या सर्व हेल्पलाइन क्रमांकांची नोंद करून ठेवायला हवी. आपण कुठे राहतो त्या विभागाचे पोलीस ठाण्याचे क्रमांक, वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा क्रमांक, पोलीस उपायुक्तांचा क्रमांक, माहिती करून तो मोबाइलमध्ये सुरक्षित ठेवायला हवा. काही वेळा लोकल ट्रेनमध्ये काही वस्तू विसरल्या जातात. त्यासाठी रेल्वेच्या ९८३३३३ ११११ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क केला तर आपली हरवलेली वस्तू परत मिळण्यास मदत होते. प्रत्येक रेल्वे स्थानकात हेल्पलाइनची स्वतंत्र टेलिफोन सेवा आहे. आपण ज्या गाडीत होतो त्या गाडीची वेळ सांगितली की पुढील स्थानकात गाडीतून ती वस्तू शोधून काढली जाते. लोकसत्ता मुंबई, चतुरंग, शनिवार, १०-०१-२०१५ लेखकः श्री. सुहास बिऱ्हाडे लिंकः http://www.loksatta.com/chaturang-news/women-wants-to-break-wheel-of-insecurity-1059201/2/#