शनिवार, १७ जानेवारी, २०१५

असुरक्षेचं चक्र भेदायचंय.. प्रत्येक स्त्रीने वाचुन आमलात आणलात आणावी अशी अतिशय महत्वपुर्ण माहिती

असुरक्षेचं चक्र भेदायचंय.. प्रत्येक स्त्रीने वाचुन आमलात आणलात आणावी अशी अतिशय महत्वपुर्ण माहिती स्त्रीचं पुढे जात राहणं आता अपरिहार्य आहे. पण या मार्गावर विकृती, हिंसा, शोषण दबा धरून बसलेले आहेत. त्या सगळ्यातून वाचत, वाचवत आपला मार्ग सुकर करायचा असेल तर प्रत्येक तरुणीने, स्त्रीनेच खंबीर, सजग व्हायला हवं. पोलिसांच्या यंत्रणांचा यथायोग्य वापर करीत स्वत:ला सुसज्ज बनवत तिने स्वत:भोवतीचं असुरक्षेचं चक्र भेदायचं आहे. नव्या वर्षांत हा संकल्प करायलाच हवा. स्वत:साठी आणि स्त्रीवर्गासाठीही.. घरबसल्या अशी करावी तक्रार प्रत्येक शहराच्या पोलिसांच्या स्वतंत्र वेबसाइट्स (संकेतस्थळे) आहेत. त्यावर सर्वाचे ई-मेल्स, फोन नंबर्स असतात, तक्रारीचा अर्ज असतो. पण कोणीही त्या मुद्दाम शोधून काढायच्या भानगडीत सहसा पडत नाही आणि या सुविधेपासून आपण वंचित राहतो. अशी संकेतस्थळे शोधणे कठीण नाही. उदाहरण द्यायचे झाले तर समजा, आपल्याला मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावर जायचे आहे, मग ते शोधायचे कसे.. ही पद्धत अतिशय सोपी आहे. गुगल सर्चवर जाऊन मुंबई पोलीस (mumbaipolice ) असे टाइप केले की मुंबई पोलिसांचे अधिकृत संकेतस्थळ समोर येईल. अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या शहराच्या, जिल्ह्य़ातील पोलिसांचे संकेतस्थळ शोधू शकता. या संकेतस्थळावर पोलीस महासंचालकांपासून त्या त्या शहरातील पोलीस आयुक्त, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे क्रमांक आणि ई-मेल दिलेले असतात. या ई-मेलवर काही पाठवले तर कोण दखल घेणार, कोण वाचणार, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. एक छोटेसे उदाहरण. काही महिन्यांपूर्वी मुंबईतल्या एका तरुणाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. त्याने मी जीवनाला कंटाळलोय, आत्महत्या करतोय असा मेल मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पाठवला. घरात बसल्या बसल्या त्याने मुंबई पोलिसांचे संकेतस्थळ उघडले आणि आयुक्तांना मेल केला. मित्रांना कळवलं तर ते मन परावृत्त करायला येतील, अशी त्याला भीती होती. पण हा मेल पोलीस आयुक्तांनी वाचला. त्वरित सायबर सेल विभागाला या तरुणाला शोधून त्याला थांबविण्याचे आदेश दिले. काही तासांतच पोलीस त्याच्या घरात पोहोचले आणि त्याला आत्महत्येपासून रोखले. अलीकडे स्त्रियांना भेडसावणारा त्रास सायबरसंबंधातील गुन्ह्य़ांचा असतो. इंटरनेटवर अश्लील फोटो बनवून टाकणं, अनोळखी मोबाइल क्रमांकातून अश्लील मेसेजेस पाठवणं, असे अनेक प्रकार केले जातात. हे सर्व प्रकार सायबर गुन्ह्य़ात मोडतात. त्यामुळे अशा तक्रारी सायबर पोलिसांकडे कराव्यात. मुंबईत वांद्रे येथील बीकेसीमध्ये स्वतंत्र सायबर सेल पोलीस ठाणे आहे, तर पोलीस आयुक्तांच्या मुख्यालयात (क्रॉफर्ड मार्केट) गुन्हे शाखेची सायबर सेल शाखा आहे. याशिवाय आपण त्या त्या ठिकाणच्या प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर गुन्ह्य़ासंबंधातील तक्रारी नोंदवू शकतोच. एकटय़ाने प्रवास करणाऱ्या स्त्रियांसाठी मुंबई पोलिसांनी ९९६९ ७७७ ८८८ ही एसएमएस सेवा सुरू केली आहे. टॅक्सी, रिक्षात बसल्यावर त्या वाहनाचा क्रमांक या मोबाइल नंबरवर फक्त एसएमएस करायचा. हा मोबाइल जीपीएस प्रणालीवर काम करतो. जेणेकरून तुमच्या प्रवासस्थानाची नियंत्रण कक्षात नोंद राहते. रात्रीच्या वेळी टॅक्सी-रिक्षा पकडताना स्थानकाबाहेरच्या स्टँडवरूनच पकडावी. मुंबईतल्या प्रमुख रेल्वे स्थानकाच्या बाहेर रात्री बारानंतर टॅक्सी, रिक्षात बसणाऱ्या प्रत्येक स्त्रीची नोंद ठेवली जाते. टॅक्सीप्रवासादरम्यान कुठलीही तक्रार नोंदवण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांच्या ०२२-२४९३९७१७ या नियंत्रण कक्षातील क्रमांकावर किंवा ८८७९ २२ ११०० या हेल्पलाइनवर संपर्क करावा. जेणेकरून त्यावर भाडे नाकारणे किंवा इतर कारवाई होऊ शकते. आपल्या आजूबाजूला, किंवा ट्रेनमध्येही असं काही चित्रण होत नाही ना, यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. असं कुणी आढळल्यास त्याची तक्रार तुम्ही रेल्वे पोलिसांकडे करू शकता किंवा हेल्पलाइन वर संपर्क साधू शकता.) (GRP -९६६२५००५०० RPF ९००३१६१७०) स्त्रियांना कुठल्याही प्रकारणी तक्रार करायची असल्यास १०० (राज्यात सर्वत्र)आणि १०३ (फक्त मुंबईपुरता)हे दोन हेल्पलाइन क्रमांक आहेत. संकटकाळी या क्रमांकांवर संपर्क केल्यास अवघ्या ५ ते १० मिनिटांत मदत पोहोचू शकते. हे झालं आपत्कालीन परिस्थितीत. पण जर एखाद्या गुन्ह्य़ाची तक्रार करायची असेल तर आता पोलीस ठाण्यातही जायची गरज नाही. एक फोन केला तरी महिला पोलीस (साध्या वेषात) घरी येऊन तक्रार नोंदवून घेतात. जर आपल्या सभोवताली एखादा गैरप्रकार सुरू असेल त्याची माहिती द्यायची असेल आणि आपलं नाव गुप्त ठेवायचं असेल तर ७७३८ १३३ १३३ किंवा ७७३८ १४४ १४४ या क्रमांकांवर फक्त एसएमएस करायचा. प्रत्येकीच्या हातात मोबाइल फोन, स्मार्टफोन असतो. त्यात हजारो क्रमांक असतात. त्यात या सर्व हेल्पलाइन क्रमांकांची नोंद करून ठेवायला हवी. आपण कुठे राहतो त्या विभागाचे पोलीस ठाण्याचे क्रमांक, वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा क्रमांक, पोलीस उपायुक्तांचा क्रमांक, माहिती करून तो मोबाइलमध्ये सुरक्षित ठेवायला हवा. काही वेळा लोकल ट्रेनमध्ये काही वस्तू विसरल्या जातात. त्यासाठी रेल्वेच्या ९८३३३३ ११११ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क केला तर आपली हरवलेली वस्तू परत मिळण्यास मदत होते. प्रत्येक रेल्वे स्थानकात हेल्पलाइनची स्वतंत्र टेलिफोन सेवा आहे. आपण ज्या गाडीत होतो त्या गाडीची वेळ सांगितली की पुढील स्थानकात गाडीतून ती वस्तू शोधून काढली जाते. लोकसत्ता मुंबई, चतुरंग, शनिवार, १०-०१-२०१५ लेखकः श्री. सुहास बिऱ्हाडे लिंकः http://www.loksatta.com/chaturang-news/women-wants-to-break-wheel-of-insecurity-1059201/2/#

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा