दहावी-बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना पुढील करिअरची दिशा
सुस्पष्ट व्हावी, याकरता २९ व ३० मे रोजी मुंबईतील रवींद्र नाटय़ मंदिर येथे विद्यालंकार
प्रस्तुत आणि आयटीएम ग्रूप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स यांच्या सहकार्याने 'लोकसत्ता मार्ग
यशाचा' या
परिसंवादाचे आयोजन
करण्यात आले होते. या परिसंवादाचे उद्घाटन राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे
यांच्या उपस्थितीत झाले. या परिसंवादात करिअर निवडीसंबंधित विविध पैलूंबाबत
तज्ज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनाचा संपादित अंश देत आहोत.
.
विवेक वेलणकर
करिअर समुपदेशक
सर्वप्रथम दहावी-बारावीची परीक्षा देणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांचे
हार्दिक अभिनंदन! आणि पालकांचे त्याहीपेक्षा मनापासून अभिनंदन! कारण गेले वर्षभर
तुम्ही तुमच्या पाल्यांमागे, 'अरे अभ्यास कर, अभ्यास कर' असा धोशा लावला असणार आणि तुमच्या मुलांनी
तुमचे रक्त चांगलेच आटवले असणार. पण आता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे आणि
दहावीचाही काहीच दिवसांत जाहीर होईल. मग आता घराघरांत 'पुढे काय' या सार्वत्रिक प्रश्नाची चर्चा सुरू असेल.
शेजारीपाजारी, नातेवाईक, मित्रमैत्रिणी सगळ्यांनीच या प्रश्नाचे उत्तर आपापल्या परीने देऊन
तुम्हाला भंडावून सोडले असेल. पण एक लक्षात घ्या मित्रांनो, हा प्रश्न आताच्या वळणावर सर्वात
महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचे उत्तर तुम्हीच शोधायला हवे. त्यासाठी मदत म्हणून हा
प्रपंच!
आपल्याकडे करिअर
किंवा दहावीनंतर शाखा निवडीच्या तीन पद्धती आहेत. यातील पहिली पद्धत म्हणजे निकाल
लागल्यावर मिळालेल्या टक्क्यांनुसार कला-वाणिज्य-विज्ञान या शाखेची निवड करणे!
दुसरी पद्धत म्हणजे नातेवाईकांच्या रेटय़ाला बळी पडणे आणि तिसरी पद्धत म्हणजे मित्र
कोणत्या शाखेसाठी जात आहेत, ते पाहूनच आपली शाखा निवडणे! मात्र एक गोष्ट
नेहमी लक्षात ठेवा, हे तीनही मार्ग प्रचंड घातक आहेत.
टक्के हा काही करिअर
निवडीचा मार्ग असू शकत नाही. अमुक अमुक टक्के मिळाले, म्हणजे तुम्ही विज्ञान शाखेचीच निवड
करायला हवी, असे अजिबात नाही. उलट जास्त टक्के असले आणि विज्ञान शाखेची आवड नसली,
तर बिनदिक्कत इतर
शाखा निवडावी. शाखा निवडताना प्रत्येक विद्यार्थ्यांने तीन कोष्टके तयार करावीत.
शाळेत आपल्याला अभ्यास करण्यासाठी सर्वात जास्त आवडणारे, झेपणारे विषय, मध्यम आवडणारे, झेपणारे विषय आणि अजिबात न आवडणारे व
झेपणारे विषय! या तीन कोष्टकांत शाळेतील आपले विषय बसवावेत. सर्वात जास्त आवडणारे
विषय आणि तुम्हाला दहावीत मिळालेले टक्के, यांचे समीकरण जुळले, तर मग त्या शाखेची निवड करावी.
हा झाला करिअर अथवा
शाखा निवडीचा सोपा मार्ग! पण शास्त्रशुद्ध मार्गाने शाखा निवडायची असेल, तर मग अभिक्षमता
चाचणी किंवा कल चाचणी हा उत्तम उपाय आहे. आता वर्षभर आधीच चाचण्या देऊन वैतागलेली
दहावी-बारावीची मुले, 'ही कोणती बुवा नवीन चाचणी!' असे म्हणतात. पण ही अतिशय सोपी चाचणी आहे. ही
चाचणी देण्यासाठी कोणत्याही अभ्यासाची गरज नसते. किंबहुना पाटी जेवढी कोरी ठेवाल,
तेवढा तुमचा फायदा
होईल. बरे, या चाचणीतील सकारात्मक मुद्दे नाही घेतलेत, तरी नकारात्मक मुद्दय़ांकडे नीट लक्ष द्या!
तेवढे बाजूला ठेवून जे उरेल, त्याची निवड डोळे झाकून करा! पण तुमचा निर्णय
निकाल लागण्याआधी होणे आवश्यक आहे.
आजकालच्या पालकांचे
मला एक कळत नाही. सगळे पालक आपल्या मुलांबद्दल हमखास एकच गोष्ट सांगतात. 'डोकं अफाट आहे हो,
पण अभ्यास करत नाही.'
सगळ्यांचीच डोकी
अफाट आणि सगळेच अभ्यास करत नाहीत! छान आहे. 'नाही हो, माझ्या मुलाची आकलनक्षमता तुलनेने कमी आहे,'
असे सांगणारा माणूस
लाखांतून एक सापडतो. पालकांनीही मुलांना त्यांची 'डोकी' स्वत: जोखण्याची संधी द्यायला हवी.
मुलांनीही स्वत:चे विश्लेषण प्रामाणिकपणे करायला हवे. त्यानंतरच पुढील मार्ग जास्त
सोपा होईल.
आता आपण करिअरच्या
काही मार्गाकडे पाहू या. करिअरचे काही मार्ग थेट दहावीनंतरच उघडे होतात. त्यातील
सर्वात सोपा मार्ग म्हणजे आयटीआय! एके काळी आयटीआयला फारशी प्रतिष्ठा नव्हती. आयटीआयमध्ये
शिकलेला मुलगा म्हणजे कामगार श्रेणीतील, असा एक समज होता. मात्र आयटीआय हा जगण्यासाठी
आवश्यक असलेल्या गोष्टी शिकवणारा व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम आहे. आता तर अनेक
प्रतिष्ठित कंपन्यांनी काही आयटीआय दत्तक घेतले आहेत. त्यामुळे या कंपन्यांना
लागणारे तंत्रकुशल मनुष्यबळ आयटीआयमधून तयार होते. परिणामी, हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर थेट नोकरी
मिळण्याचीही शक्यता वाढते. तसेच आता आयटीआय पूर्ण केल्यानंतर अभियांत्रिकीच्या
पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेणे शक्य बनले आहे. दहावीनंतर आणि बारावीपर्यंत
व्होकेशनल अभ्यासक्रम, हादेखील उत्तम पर्याय आहे.
होमसायन्स या
अभ्यासक्रमाकडे आज अनुल्लेखाने बघितले जाते. वास्तविक मुलींसाठी हा अभ्यासक्रम
उत्तम आहे. या अभ्यासक्रमात जीवनकौशल्ये शिकवली जातात. त्यात अंतर्गत सजावटीपासून
स्वयंपाकापर्यंतच्या अनेक गोष्टी शिकवल्या जातात. हा पाच वर्षांचा पदवी अभ्यासक्रम
आहे. त्यानंतर कार्यक्षेत्राची अनेक कवाडे उघडू शकतात.
आपल्याकडे मुलांची
चित्रकला, रांगोळी
आदी गुण अगदी नववीपर्यंत वाखाणले- मिरवले जातात. पण जसे दहावीचे वर्ष सुरू होते,
तसा पालकांचा सूर
बदलतो. 'बस करा
रंग उधळणं, अभ्यास करा,' अशी तंबी दिली जाते. पण हीच कला पुढे आयुष्यात
करिअर बनू शकते, हे आपल्यापैकी अनेकांना माहीत नसते. पण 'फाइन आर्ट्स' या विषयात डिप्लोमा केलेल्यांना करिअरच्या
अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. यात मल्टिमीडिया अॅनिमेशनसाठी लागणारी अनेक कौशल्ये
या डिप्लोमामध्ये शिकता येतात. सध्या मल्टिमीडिया अॅनिमेशन या प्रकाराला खूपच
मागणी आहे.
दहावीनंतर
अभियांत्रिकी शाखेच्या पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. याचे काही फायदे
आहेत आणि काही तोटेही आहेत. सर्वप्रथम आपण फायदे बघू या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे
दहावीमध्ये चांगले गुण मिळाले असल्यास डिप्लोमासाठी उत्तम महाविद्यालयात प्रवेश
मिळण्यात अडचण येत नाही. तसेच बारावीनंतर सीईटी, जेईई आदी परीक्षा देण्याची गरज पडत नाही.
डिप्लोमा झाल्यावर डिग्रीच्या थेट दुसऱ्या वर्षांला प्रवेश घेणे शक्य असल्याने
डिप्लोमानंतर डिग्री करण्याचा पर्यायही खुला राहतो. डिप्लोमामध्ये अभियांत्रिकीचा
पाया पक्का झाल्यास डिग्री अभ्यासक्रमाला सामोरे जाणे सोपे होते. आणखी महत्त्वाचे
म्हणजे अभियांत्रिकी डिप्लोमाच्या बळावर रेल्वेपासून लष्करापर्यंत आणि खासगी
कंपन्यांतही नोकरी मिळू शकते. दहावीनंतर थेट डिप्लोमा करण्याचे काही तोटेही आहेत. सर्वात
महत्त्वाचे म्हणजे, ज्यांनी आपल्या करिअरबद्दल विचार केलेला नाही, त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम नाही. दुसरा
आणि सर्वात महत्त्वाचा तोटा म्हणा किंवा एक अट म्हणा, डिप्लोमाच्या तिसऱ्या वर्षांला तुम्हाला
उत्तम गुण मिळाले, तरच तुम्हाला डिग्रीसाठी चांगले महाविद्यालय वा संस्था मिळू शकेल.
शेवटी
विद्यार्थ्यांनी कोणतेही करिअर निवडले, तरी त्यात झोकून देऊन काम करण्याची तयारी ठेवायला
हवी. त्याबाबत त्यांनी अमिताभ बच्चन
यांचे उदाहरण
डोळ्यांसमोर ठेवायला हवे. ४५ वर्षे करिअर करूनही त्यांची तळमळ अजूनही कमी झालेली
नाही. शेवटी 'थ्री इडियट्स' या चित्रपटातील एक संवाद सगळ्यांनी लक्षात
ठेवायला हवा, 'कामयाबी के पीछे मत भागो, काबील बनों.. कामयाबी पीछे आएगी'
विज्ञान- तंत्रज्ञानाच्या वाटा हजार
विज्ञान
विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना बारावीनंतर वैद्यकीय, अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान आणि औषधनिर्माणशास्त्र
यापलीकडेही अनेक कवाडे खुली असतात..
* वैद्यक शाखेला जाण्यास इच्छुक विद्यार्थ्यांनी देशपातळीवरील 'एआयपीएमटी'ची सीईटी देणे
अत्यावश्यक आहे. देशभरातील सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांतील १५ टक्के जागा
या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतात.
* पशुवैद्यक हा
अभ्यासक्रम सध्या दुर्लक्षित असला, तरी त्याला जागतिक स्तरावर आणि आपल्याकडेही उत्तम
मागणी आहे. देशाबाहेरही उत्तम संधी असलेल्या या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी
मोठय़ा संख्येने वळायला हवे.
* फिजिओथेरपी, स्पीच थेरपी आणि
बी.एस्सी. नर्सिग हे तीन अभ्यासक्रम मुलींसाठी उत्तम अभ्यासक्रम आहेत. नर्सिग
केलेल्या मुलींना परदेशांतही उत्तम संधी मिळते. नर्सिग क्षेत्राद्वारे देशाबाहेर
जाणाऱ्या मुलींची संख्या सॉफ्टवेअर अभियंत्यांपेक्षाही जास्त आहे.
* महाराष्ट्रात सध्या
अभियांत्रिकी शाखेतील ७० प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यात पेट्रोलियम
अभियांत्रिकी, पर्यावरण अभियांत्रिकी, ऊर्जा अभियांत्रिकी अशा अनेक शाखांचा समावेश आहे.
नजिकच्या भविष्यकाळात महत्त्व प्राप्त होणाऱ्या या शाखांचा विचारही
विद्यार्थ्यांनी करायला हवा.
* र्मचट नेव्ही
हेदेखील एक साहसी करिअर विज्ञान शाखेतील मुलांना खुले आहे. मात्र, हे क्षेत्र इतरांहून
वेगळे आहे. या अभ्यासक्रमाचे शुल्क जास्त असले, तरी नंतर या नोकरीचे वेतनही त्याच पटीत
भरभक्कम मिळते.
* वैमानिक होणे,
ही अनेकांची
महत्त्वाकांक्षा असते. त्यासाठी बारावीत विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र- रसायनशास्त्र
आणि गणित हा अभ्यासगट घेणे आवश्यक आहे. अनेक खासगी वैमानिक प्रशिक्षण संस्था
यासंबंधीचे प्रशिक्षण देतात. त्यात रायबरेली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान
संस्था ही अग्रणी संस्था आहे.
* अवकाश संशोधनामध्ये
जाण्यास इच्छुक विद्यार्थ्यांसाठी इस्रो संस्थेत प्रशिक्षण घेता येते. मात्र,
तेथील प्रवेशासाठी
त्रिवेंद्रम येथील आयआयएसटी या संस्थेत प्रवेश मिळवणे योग्य ठरते. बारावीनंतर या
संस्थेमार्फत चार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करता येतो. मात्र, संस्थेत प्रवेश
घेण्यासाठी जेईई मेन्स आणि बारावीचे गुण एकत्रितपणे ग्राहय़ धरले जातात.
* विज्ञान शाखेत
संशोधन करायचे असल्यास प्रशिक्षणाचे अनेक मार्ग खुले आहेत. आयआयएसईआर या
संस्थेमध्ये पाच वर्षांचा संशोधन अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमात ५० टक्के जागा
बारावीच्या गुणांवर मिळतात. या अभ्यासक्रमाबरोबर एनआयएसइआर संस्थेतही संशोधनासाठी
अभ्यासक्रम आहेत.
* दहावीनंतर पुढील
किमान दहा वर्षे शिकण्यात स्वारस्य आणि आर्थिक पाठबळ असलेल्यांना बायोटेक्नॉलॉजी
या क्षेत्रात संशोधन करण्याचा पर्याय निवडता येईल. या क्षेत्रात एम.एस्सी. आणि
पीएच.डी. या पदव्या घेऊन पुढे संशोधन करता येऊ शकते.
विद्याशाखा कोणतीही असो..
करिअरचे अनेक पर्याय
असेही आहेत, ज्यासाठी तुम्ही कोणत्याही शाखेतून शिक्षण घेत असलात, तरी काहीच फरक पडत
नाही. म्हणजे कला-वाणिज्य-विज्ञान अशा कोणत्याही शाखेतील विद्यार्थ्यांसाठी या
अभ्यासक्रमांची दारे उघडू शकतील..
* विधि या विषयात
करिअर करायचे असेल, तर बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी नॅशनल लॉ स्कूलमध्ये प्रवेश घेऊ
शकतात. त्यासाठी बारावीनंतर सीएलएटी ही परीक्षा द्यावी लागते. त्यानंतर देशातील
विविध शहरांत असलेल्या या नॅशनल लॉ स्कूलमधून कायद्याचे शिक्षण घेऊन तुम्ही
करिअरची वाट निवडू शकता.
* हॉटेल मॅनेजमेण्ट या
क्षेत्रालाही शाखेचे बंधन नाही. कोणत्याही शाखेचा विद्यार्थी बारावीनंतर या
अभ्याक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतो. मात्र, त्याकरता राष्ट्रीय पातळीवरील सीईटी देणे
बंधनकारक आहे. महाराष्ट्राच्या स्वतंत्र सीईटीत उत्तीर्ण झालात तर राज्यभरातील
नामांकित संस्थांमधून हा अभ्यासक्रम पूर्ण करता येतो. त्याशिवाय हॉटेल
मॅनेजमेण्टचा तीन वर्षांचा डिप्लोमा अभ्याक्रमही अनेक संस्थांमध्ये उपलब्ध आहे.
* चित्रकलेत गती
असलेल्या आणि गणित उत्तम असलेल्या विद्यार्थ्यांना वास्तूशास्त्र या विषयातही
करिअर घडवता येईल. त्यासाठी बारावीनंतर नाटा ही परीक्षा द्यावी लागते.
* बॅचलर ऑफ फाइन
आर्ट्स या पदवीसाठीही सीईटी परीक्षा होते. हा पर्याय सर्व शाखांतील
विद्यार्थ्यांना खुला आहे.
* डिझायनिंग या विषयात
करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. डिझायनिंगमध्येही इंटिरिअर, फॅशन, प्रॉडक्ट असे अनेक
प्रकार आहेत. अहमदाबादची नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझायनिंग ही संस्था या
अभ्यासक्रमासाठी सर्वोत्तम आहे. या संस्थेच्या प्रवेशासाठी बारावीनंतर प्रवेश
परीक्षा द्यावी लागते. ं
* मास कम्युनिकेशन आणि
पत्रकारिता या अभ्यासक्रमांसाठीही बारावीनंतर कवाडे खुली होतात. त्यासाठी
विद्याशाखेची अट नाही.
* सर्व
विद्याशाखांच्या पदवीधरांना यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग, स्टाफ सिलेक्शन अशा स्पर्धा परीक्षा देता
येतात.