सोमवार, ८ जून, २०१५

करिअरमधील यशासाठी'सॉफ्ट स्किल्स'आवश्यक! लोकसत्ता करिअर वृत्तान्त मुंबई दिनांक सोमवार ८ जून २०१५

दहावी-बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना पुढील करिअरची दिशा सुस्पष्ट व्हावी, याकरता २९ व ३० मे रोजी मुंबईतील रवींद्र नाटय़ मंदिर येथे विद्यालंकार प्रस्तुत आणि आयटीएम ग्रूप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स यांच्या सहकार्याने  'लोकसत्ता मार्ग यशाचा' या  परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाचे उद्घाटन राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत झाले. या परिसंवादात करिअर निवडीसंबंधित विविध पैलूंबाबत तज्ज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनाचा संपादित अंश देत आहोत..

गौरी खेर
संस्थापक, हॉस्पिटॅलिटी कोरम


एकाच प्रकारचे शिक्षण घेऊनही काहीजण अधिक यशस्वी होतात आणि काही मागे पडतात, याचे कारण सॉफ्ट स्किल्समध्ये दडलेले आहे. सॉफ्ट स्किल्समध्ये नेतृत्वगुण, वर्तणूक, सहनशीलता, समोरच्याचे ऐकून घेण्याचे कौशल्य, संभाषणचातुर्य अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो, ज्या यशस्वी जीवन जगण्यासाठी 
आवश्यक असतात. 
'फिक्की' या संघटनेच्या 'इंडिया स्किल रिपोर्ट २०१४'मध्ये आपल्या देशातील एकूण पदवीधरांपैकी ५० टक्के पदवीधर नोकरीच्या बाजारपेठेत अपात्र ठरतात आणि त्यामागील अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे सॉफ्ट स्किल्सचा अभाव, असे नमूद केले आहे. यातूनच 'सॉफ्ट स्किल्स'चे महत्त्व अधोरेखित होते. 
१९९०च्या जागतिकीकरणानंतर आपल्याकडच्या कॉर्पोरेट क्षेत्रात बराच बदल झाला. भारतात पाऊल रोवणाऱ्या परदेशी कंपन्यांची कार्यसंस्कृती वेगळी होती. भाषा, संस्कृती वेगळी असणाऱ्या कर्मचारीवर्गात समन्वय राखण्यासाठी कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांसाठी सॉफ्ट स्किल्सच्या प्रशिक्षणाची गरज 
भासू लागली. या नव्या कार्यसंस्कृतीने आपल्या कामाच्या अनेक संकल्पना मूळापासून बदलल्या. आजच्या काळात तुम्ही 'अपडेटेड' नसाल तर लवकरच 'आऊटडेटेड' होता, हे तुम्ही लक्षात घ्यायला हवे. 
प्रत्यक्ष काम करण्यासाठी लागतात ती 'हार्ड स्किल्स'. ती आपल्याला अभ्यासक्रमातून, शिक्षणातून मिळतात. मात्र, या व्यतिरिक्त व्यक्तिमत्त्वाशी संबंधित जी काही कौशल्ये असतात, ती म्हणजे सॉफ्ट स्किल्स. सॉफ्ट स्किल्समुळे आपल्या 'हार्ड स्किल्स'ना चकाकी येते.
भावनिक बुद्धिमत्ता आणि सॉफ्ट स्किल्समुळे आपल्या करिअरची वाट सुकर बनते. संवादकौशल्य, वेळेचे व्यवस्थापन, तणाव व्यवस्थापन, वाटाघाटींचे कौशल्य, श्रवणकौशल्य या कौशल्यांचे महत्त्व महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच लक्षात घ्यायला हवे. आजच्या कॉर्पोरेट जगतात काही एटिकेट पाळणे नितांत आवश्यक असते. आपली देहबोली, हावभाव याविषयीचे मॅनरिझम कटाक्षाने पाळावे लागतात. फोनवर बोलण्याचे संकेत, ई-मेल एटिकेट मुलांनी माहिती करून घ्यायला हवेत. सीव्ही कसा लिहावा, मुलाखत देताना कुठल्या गोष्टींचे भान ठेवावे, गटचर्चेत आपली कामगिरी उंचावण्यासाठी काय करता येईल, हे विद्यार्थिदशेत जाणून घेणे त्यांच्या पुढच्या करिअरला पूरक ठरते. सोशल मीडियातील तुमच्या वावरावरही कंपन्यांची नजर असते, हे मुलांनी लक्षात ठेवायला हवे. वागण्या-बोलण्याचे हे सारे संकेत जाणून घेणे कॅम्पसमधून थेट कॉर्पोरेट जगतात उडी मारताना अत्यावश्यक ठरतात.
आज इंग्रजीवर प्रभुत्व मिळवणे अनिवार्य आहे. इंग्रजीतून संवाद साधण्यासोबतच व्यापारविषयक वाटाघाटी, ई-मेल अथवा अहवाल लेखन आणि सादरीकरणासाठी इंग्रजी भाषेवर पकड मिळवणे आजच्या कॉर्पोरेट जगतात महत्त्वाचे आहे. 
सॉफ्ट स्किल्स ही जीवन कौशल्ये असतात. ती आपल्याला जन्मभर पुरतात. ती एखाद्या कार्यशाळेतील सहभागाने साध्य होत नाहीत तर त्यावर आपल्याला सतत काम करावं लागतं. जितके तुम्ही घरच्या सुरक्षित वातावरणाच्या पलीकडे झेपावत बाहेरच्या जगाचा अनुभव घ्याल, तितक्या या गोष्टी तुमच्यात अधिकाधिक विकसित होतील. जितक्या उत्साहाने आणि पुढाकार घेऊन तुम्ही नव्या गोष्टी शिकाल किंवा अनुभवाल तितका त्याचा अधिक लाभ तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये होईल. त्यासाठी छंद जोपासा. लहान-मोठे अभ्यासक्रम शिका. शिक्षण घेतानाच आर्थिक मोबदल्याची अपेक्षा न ठेवता कामाचा अनुभव घ्या. काम केल्याने परिपक्वता येते. आपला र्सवकष दृष्टिकोन विकसित व्हायला यामुळे मदत होते. आपल्याला ज्या विषयाची आवड आहे किंवा ज्यात करिअर करायचे आहे, अशा क्षेत्रांत काम करण्याचा अनुभव किंवा अशा क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींशी केलेला संवाद उपयोगी पडतो. पालकांनीही मुलांच्या या गोष्टींकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला हवे. याला लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याचे उद्योग म्हणून हिणवू नये. 
महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांत भाग घेतल्यानेही व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू पडतात. कुठल्याही प्रकारची कार्यशाळा व प्रशिक्षण न घेता हे साध्य करता येते. महाविद्यालयीन व आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा, नाटय़ स्पर्धा, गिर्यारोहण मोहिमा यासारख्या उपक्रमांमध्ये सहभागी होणे अशा कितीतरी गोष्टी महाविद्यालयीन वर्षांमध्ये तुम्हाला करता येतील आणि या गोष्टी तुमच्या 'सीव्ही'वर कायम राहतील, हे ध्यानात घ्या. 
सॉफ्ट स्किल्स विकसित करण्याच्या दृष्टीने अफाट वाचन उपयुक्त ठरते. ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने जग जिंकले अशा व्यक्तींची चरित्रे, आत्मचरित्रे वाचल्यानेही आपला दृष्टिकोन विस्तारण्यास 
मदत होते. नोकरीच नव्हे तर व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांनादेखील याचा फायदा होतो. आपले वक्तव्य, सादरीकरण कसे असावे याकरता 'यूटय़ूब'वरील 'टेड टॉक' जरूर बघा, ऐका. 
एखाद्या स्वयंसेवी संस्थेसोबत काम करण्याचा अनुभवही आपल्याला बरेच काही शिकवून जातो. या संस्थांच्या निमित्ताने फिल्ड व्हिजिटचा अनुभव मिळतो. कुठल्या कामातून, अनुभवातून तुम्हाला तुमचे खरे करिअर सापडेल हे सांगता येत नाही. त्यामुळे, सतत नवनवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. अशा सवयी स्वत:ला जडवा, ज्या तुम्हाला तुमच्या अभ्यासात आणि नंतर करिअरमध्ये उपयोगी पडतील. उदा. वेळेचे व्यवस्थापन, नियमित व्यायाम.
करिअरला उपयोगी ठरणाऱ्या या सॉफ्ट स्किल्सच्या विकासासाठी महाविद्यालयीन वर्षांमध्येच गुंतवणूक करा. जेणेकरून याचे सकारात्मक परिणाम तुम्हाला शिक्षण झाल्यावर नोकरीच्या बाजारपेठेत उतरल्यानंतर जाणवतील. सॉफ्ट स्किल्समुळे तुमच्या अंगभूत गुणांना अधिक झळाळी येते आणि तुमचं व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध बनतं..


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा