इंटरनेट, दूरदर्शन, मोबाइल फोन इत्यादी साधनांमुळे आज संपूर्ण जग जवळ आले आहे. नवीन
व्यवसाय, रोजगारांच्या
संधी देशोदेशी उपलब्ध होत आहेत. त्यांचा वापर करण्यासाठी आपल्याला सर्व जगाचे भान
ठेवणेही तेवढेच गरजेचे झालेले आहे. आणि जगाचे ज्ञान करून घेण्याचा एक महत्त्वाचा
स्रोत म्हणजे जगाचा एॅटलास.
शाळेत असताना जिल्हा,
राज्य, संपूर्ण भारत देशाचा,
जगाचा भूगोल आपण
जाणून घेतला होता. त्यावेळी ही माहिती आपण पृथ्वीचा गोल, भिंतीवरील किंवा पुस्तकातील नकाशे
याद्वारे घेत होतो. परंतु इंटरनेटमुळे आता ही माहिती एका क्लिकवर उपलब्ध झाली आहे.
ही माहिती मनोरंजक पद्धतीने, नेमके प्रश्न विचारून आपल्याला मिळवता येते.
नकाशांसहित विविध देश, प्रांत, शहर, रस्ते, रेल्वे, विमान तसेच जल मार्ग यांची माहिती देणा-या अनेक साइटस इंटरनेटवर
तुम्हाला दिसतील. त्यातील एक प्रातिनिधिक साइट म्हणजे www.worldatlas.com
या साइटवर जगातील
सर्व खंडांची म्हणजेच आफ्रिका, आशिया, अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया इत्यादींची माहिती उपलब्ध आहे. येथे
प्रत्येक देशातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे, तिथल्या ठळक गोष्टी जसे की, देशाची राजधानी,
लोकसंख्या, चलन, प्रतीके, झेंडे, भौगोलिक आणि
ऐतिहासिक माहिती, विविध प्रकारची आकडेवारी असे सविस्तर ज्ञान आपल्याला होते. एखादा
पत्ता शोधण्याची सोय, चलनाचा कन्व्हर्टर, दोन शहरांतील अंतर काढण्याची सोय येथे उपलब्ध
करून दिली आहे. जगभरातली पर्यटन स्थळांची माहितीही येथे नमूद केली आहे. संबंधित
वहातूक व्यवस्था, विमानतळ, रेल्वे इत्यादींची माहिती येथे दिली आहे.
आपले ज्ञान तपासून
पाहू इच्छिणाऱ्या वाचकांसाठी तसेच अभ्यासूंसाठी प्रश्न विचारण्यात येतात. आणि अचूक
उत्तर प्रथम देणाऱ्यांना बक्षिसेही दिली जातात. तुम्हाला भौगोलिक, नकाशा किंवा
प्रवासासंबंधी प्रश्न असल्यास ते विचारण्याची सोय या साइटवर आहे. हे प्रश्न
विचारण्यासाठी तुम्हाला विविध भाषांचा पर्यायही दिलेला आहे.
या साइटवर प्रवासी
लोकांनी काढलेले मन मोहून टाकणारे सुंदर फोटो आणि व्हिडीओ या साइटची शोभा वाढवतात.
यातील लिस्ट या पर्यायामध्ये उपयुक्त माहिती एकत्रितपणे वर्गवारी करून दिलेली आहे.
ही साइट तुम्हाला आवडेल याची खात्री वाटते.
manaliranade84@gmail.com
LINK: http://www.loksatta.com/tech-it-news/world-tour-from-home-1077397/