गुरुवार, १२ मार्च, २०१५

घरबसल्या जगाची सफर

इंटरनेट, दूरदर्शन, मोबाइल फोन इत्यादी साधनांमुळे आज संपूर्ण जग जवळ आले आहे. नवीन व्यवसाय, रोजगारांच्या संधी देशोदेशी उपलब्ध होत आहेत. त्यांचा वापर करण्यासाठी आपल्याला सर्व जगाचे भान ठेवणेही तेवढेच गरजेचे झालेले आहे. आणि जगाचे ज्ञान करून घेण्याचा एक महत्त्वाचा स्रोत म्हणजे जगाचा एॅटलास.

शाळेत असताना जिल्हा, राज्य, संपूर्ण भारत देशाचा, जगाचा भूगोल आपण जाणून घेतला होता. त्यावेळी ही माहिती आपण पृथ्वीचा गोल, भिंतीवरील किंवा पुस्तकातील नकाशे याद्वारे घेत होतो. परंतु इंटरनेटमुळे आता ही माहिती एका क्लिकवर उपलब्ध झाली आहे. ही माहिती मनोरंजक पद्धतीने, नेमके प्रश्न विचारून आपल्याला मिळवता येते. नकाशांसहित विविध देश, प्रांत, शहर, रस्ते, रेल्वे, विमान तसेच जल मार्ग यांची माहिती देणा-या अनेक साइटस इंटरनेटवर तुम्हाला दिसतील. त्यातील एक प्रातिनिधिक साइट म्हणजे www.worldatlas.com


या साइटवर जगातील सर्व खंडांची म्हणजेच आफ्रिका, आशिया, अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया इत्यादींची माहिती उपलब्ध आहे. येथे प्रत्येक देशातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे, तिथल्या ठळक गोष्टी जसे की, देशाची राजधानी, लोकसंख्या, चलन, प्रतीके, झेंडे, भौगोलिक आणि ऐतिहासिक माहिती, विविध प्रकारची आकडेवारी असे सविस्तर ज्ञान आपल्याला होते. एखादा पत्ता शोधण्याची सोय, चलनाचा कन्व्हर्टर, दोन शहरांतील अंतर काढण्याची सोय येथे उपलब्ध करून दिली आहे. जगभरातली पर्यटन स्थळांची माहितीही येथे नमूद केली आहे. संबंधित वहातूक व्यवस्था, विमानतळ, रेल्वे इत्यादींची माहिती येथे दिली आहे.


आपले ज्ञान तपासून पाहू इच्छिणाऱ्या वाचकांसाठी तसेच अभ्यासूंसाठी प्रश्न विचारण्यात येतात. आणि अचूक उत्तर प्रथम देणाऱ्यांना बक्षिसेही दिली जातात. तुम्हाला भौगोलिक, नकाशा किंवा प्रवासासंबंधी प्रश्न असल्यास ते विचारण्याची सोय या साइटवर आहे. हे प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला विविध भाषांचा पर्यायही दिलेला आहे. 


या साइटवर प्रवासी लोकांनी काढलेले मन मोहून टाकणारे सुंदर फोटो आणि व्हिडीओ या साइटची शोभा वाढवतात. यातील लिस्ट या पर्यायामध्ये उपयुक्त माहिती एकत्रितपणे वर्गवारी करून दिलेली आहे. ही साइट तुम्हाला आवडेल याची खात्री वाटते.

- मनाली रानडे
manaliranade84@gmail.com


LINK: http://www.loksatta.com/tech-it-news/world-tour-from-home-1077397/

बुधवार, ११ मार्च, २०१५

गटचर्चेत सहभागी होताना..

व्यवस्थापन महाविद्यालये तसेच काही तंत्रशिक्षण, व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना लेखी परीक्षा आणि मुलाखतीसोबत'गटचर्चा'(ग्रूप डिस्कशन) हा अनिवार्य टप्पा पार करावा लागतो. गटचर्चेच्या वेळेस दिलेल्या विषयावर चर्चा करताना उमेदवाराच्या काही क्षमतांचे अवलोकन तज्ज्ञांद्वारे केले जाते. प्रामुख्याने उमेदवाराची समूहातील वर्तणूक, त्याची सांघिक वृत्ती, नेतृत्त्व क्षमता, स्वत:चे म्हणणे मांडण्याचे कसब अशा अनेक क्षमतांचा कस लागतो. गटचर्चा ही शक्यतो आठ-दहा जणांच्या समूहामध्ये ३० ते ४० मिनिटांत होते. गटचर्चेचा विषय मात्र बहुतांश वेळा चर्चा सुरू करण्याच्या वेळेस जाहीर केला जातो. त्यामुळे विषयाची पूर्वतयारी करायला वेळ मिळेलच, याची खात्री नसते.

या गुणांची चाचणी होते..


तुम्ही इतरांशी किती चांगल्या प्रकारे संवाद साधू शकता, दुसऱ्यांचे विचार किती मोकळेपणे स्वीकारता, गटचर्चा तुम्ही किती लक्षपूर्वक ऐकत आहात आणि त्यात सहभागी होत आहात, समूहाची उद्दिष्टे आणि स्वत:ची उद्दिष्टे यांना तुम्ही कशा प्रकारे महत्त्व देता हे या चर्चेतील तुमच्या कामगिरीतून अजमावले जाते. 
गटचर्चेतून तुमचे संभाषणकौशल्य, आंतरसंबंध जपण्याची कला, नेतृत्वगुण, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व, तार्किक विचारक्षमता, सृजनशीलता, चिकाटी, लवचीकपणा, दुसऱ्याच्या विचारांचा आदर करण्याची क्षमता या गुणांची चाचणी होते.


तुमचा अपेक्षित सहभाग-


* तुम्ही बोलण्यात वाकबगार असायला हवे. तुम्ही नवीन, व्यावहारिक कल्पना मांडायला हव्या. 
* चर्चेच्या वेळेस तुम्ही घेतलेली एक भूमिका कायम असावी. मात्र, दुसऱ्यांचे विचार खुल्या मनाने समजून घेण्याची तुमची तयारीही दिसायला हवी.
* समाजकारण-राजकारण-व्यापार-आर्थिक-विज्ञान-तंत्रज्ञान यांसारख्या विविध विषयांवरील सखोल ज्ञान ही तुमची जमेची बाजू असते.
* स्पष्ट शब्दोच्चार व देहबोली यांच्यावर मेहनत घ्या. 
* चर्चेला दिलेल्या विषयासंबंधी तुमच्या मनात गोंधळ असेल तर चर्चेची सुरुवात तुम्ही करू नका. अपुरे ज्ञान व चुकीच्या दृष्टिकोनामुळे नकारात्मक प्रभाव पडू शकतो. त्यापेक्षा दुसऱ्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐका. त्यातून तुम्हाला काही मुद्दे सुचू शकतात व तुम्ही चर्चेत सहभाग घेऊ शकता.
* तुमची भाषा साधी सरळ असावी. बोलण्यात स्पष्टवक्तेपणा असावा. भाषेचा वापर जपून करा. अपशब्द वापरू नका.
* चर्चेच्या शेवटी तुम्ही निर्णायक मुद्दय़ावर सहमती, असहमती किंवा तटस्थता दर्शवू शकता.
* चर्चेदरम्यान सहभागी उमेदवारांशी आपुलकीने बोला. बोलताना नजरेस नजर मिळवून आत्मविश्वासाने बोलावे. 
* दुसऱ्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकावे. त्याच्या मुद्दय़ाशी सहमत असल्यास होकारार्थी मान डोलवावी.
* बोलताना प्रत्येकाशी संवाद साधत आहात, असे दिसू द्या. एकाच व्यक्तीकडे बघून बोलू नका.


काय करावे? 


* समूहातील प्रत्येकाशी प्रसन्न चेहऱ्याने बोला.
* प्रत्येकाच्या मताचा आदर करा.
* तुमची असहमती नम्रपणे व्यक्त करा.
* बोलायला सुरुवात करण्याआधी त्या विषयाचा वेगवेगळ्या बाजूंनी विचार करा.
* विषयाशी संबंधित मुद्दय़ावरच बोला. पाल्हाळिक बोलू नका.
* बोलताना देहबोलीचे शिष्टाचार पाळा.
* समोरच्याचा एखादा मुद्दा आवडल्यास त्यावर सहमती दाखवा.

काय करू नये?

* तुमच्या मताचे खंडन केले तर ओरडून बोलू नका.
* अनावश्यक हालचाली करू नका (जसे बोट नाचवणे, टेबलावर टकटक करणे, सतत पाय हलवणे इत्यादी)
* चर्चेवर वर्चस्व गाजवण्याचा अट्टहास बाळगू नका.
* बोलणाऱ्याला मध्येच थांबवू नका. त्याचे बोलणे पूर्ण होण्याची वाट पाहा.


कामगिरी उत्तम व्हावी म्हणून..


* चर्चेदरम्यान इतरांचे वक्तव्य काळजीपूर्वक ऐका आणि नंतरच तुमची प्रतिक्रिया द्या किंवा त्या मुद्दय़ांच्या आधारे आपले म्हणणे मांडा. त्यावरून तुमची सांघिकवृत्ती दिसून येते.
* चर्चेसाठी दिलेल्या विषयाबाबत तुम्हाला विविधांगी माहिती असणे अपेक्षित असते. समस्येवर उपाय योजताना तुमच्या संकल्पना सृजनशील असणे महत्त्वाचे.
* गटचर्चेदरम्यान कोणालाही वैयक्तिक पातळीवर संबोधू नये. तुमचे बोलणे हे सर्व गटाला उद्देशून हवे. बोलताना औपचारिक भाषेचा वापर करा. तुमचा आवाज सर्वात दूर बसलेल्या व्यक्तीलाही नीट ऐकू येईल, असा असावा.


सारांश काढताना पुढील मुद्दे लक्षात ठेवा-


* नवे मुद्दे मांडू नका.
* फक्त तुमचे मुद्दे मांडू नका. इतरांच्या मुद्दय़ांनाही स्थान द्या.
* एकाच दृष्टिकोनातून पाहू नका.
* संक्षिप्त स्वरूपात म्हणणे मांडा.
* सारांश मांडून पूर्ण झाले की, नंतर पुन्हा जोडमुद्दे मांडू नका.


गटचर्चेचे प्रकार


* विषयावर आधारित गटचर्चा- याचे दोन प्रकार असतात- 
(अ) वस्तुस्थितीवर आधारित विषय- हे विषय सर्वसामान्यांच्या माहितीतले असतात. हे विषय सामाजिक, राजकीय, आर्थिक, विज्ञान इत्यादी क्षेत्रांशी निगडित असतात.
(ब) वादग्रस्त विषय- विषयावरूनच लक्षात येते, की यात एकमत असू शकत नाही. या विषयावर चर्चा करताना मुद्दा न पटल्याने आवाजाची पातळी वाढू शकते. मात्र, त्यावेळी तुम्ही स्वत:वर नियंत्रण राखत तार्किकदृष्टय़ा तुमचे म्हणणे कसे मांडता, याचे निरीक्षण पॅनेलमधील तज्ज्ञ करतात.
* केस-स्टडीवर आधारित गटचर्चा- यात विषयाऐवजी एखाद्या प्रसंगावर अथवा घटनेवर आधारित चर्चा केली जाते. यामध्ये परिस्थितीची माहिती देऊन ग्रुपला त्यावरील समस्येवर तोडगा काढण्यासाठी उपाययोजना करण्यास सांगितले जाते.


निरीक्षण आणि सराव


गटचर्चेमधील आपली कामगिरी उत्तम होण्याकरता अधिकाधिक सराव करणे उपयुक्त ठरेल. त्यासाठी वेगवेगळ्या परिसंवादांना उपस्थित राहा तसेच मित्रांचा ग्रूप बनवून त्यात गटचर्चेचा सराव करा. इतर वक्ते अथवा ग्रूपमधील इतर विद्यार्थी आपल्या प्रतिक्रिया काळजीपूर्वक आणि निष्पक्षपातीपणे कशा व्यक्त करतात, प्रश्न कसे उपस्थित करतात, एखाद्या मुद्दय़ाशी सहमती-असहमती कशी दर्शवतात याचे सखोल निरीक्षण करा. 
गटचर्चेच्या सरावामुळे वेगवेगळ्या विषयांवर विचार करण्याची सवय जडते. समोरची व्यक्ती आपले मुद्दे कसे मांडते, त्या मुद्दय़ांचे शांतपणे खंडन करून आपल्याला आपला मुद्दा कसा रेटता येईल, याचा सराव होतो. शक्य तितक्या औपचारिक-अनौपचारिक चर्चासत्रांमध्ये सहभागी झाल्याने समूहात आपले म्हणणे 
आत्मविश्वासाने मांडण्याची सवय होईल.


सुरुवात व शेवट 


* गटचर्चेत प्रारंभी बोलणे हे जसे लाभदायक असते, तसेच ते प्रभावी न झाल्यास त्याचा फटकाही बसू शकतो.
* माहितीपूर्ण संभाषणकौशल्याने तुम्ही सुरुवातीलाच अनुकूल छाप पाडलीत तर उत्तमच. मात्र, जर तुम्ही सुरुवात भीत भीत वा चुकीचे दाखले देत केलीत तर त्यामुळे न भरून येणारे नुकसान होईल.
* तुम्ही चर्चेला सुरुवात करत असाल तर ते बोलणे अचूक आणि नेमके असावे. उगाचच बोलणे लांबवू नका. जर तुम्हाला दिलेल्या विषयाचे सखोल ज्ञान असेल आणि पुरेसा आत्मविश्वास असेल तरच चर्चेची सुरुवात करा.
* अनेकदा गटचर्चेच्या शेवटी एकमत होत नाही. खरे पाहता एकमत होणे अपेक्षितही नसते. परंतु, प्रत्येक गटचर्चेच्या शेवटी सारांश मांडण्याची संधी तुम्हाला साधता येईल. त्यात मांडण्यात आलेल्या विविध मुद्दय़ांचा उल्लेख जरूर करा.

* चच्रेला सुरुवात करण्यापूर्वी सोबतच्या उमेदवारांची नावे जाणून घ्या आणि चच्रेदरम्यान इतरांना नावाने संबोधा.

* आत्मविश्वासाने आणि सुहास्य मुद्रेने मतप्रदर्शन करा. 
* आपली मते मांडताना ती मुद्देसूद, विषयाला धरून, समर्पक आणि तर्कसुसंगत असणे गरजेचे आहे. 
* स्वत:ची कामगिरी उंचावण्यासाठी आपण मांडत असलेले मुद्दे इतर उमेदवारांकडून खोडले जाणे स्वाभाविक आहे. परंतु, त्यामुळे निराश होऊन माघार घेऊ नका किंवा आक्रस्ताळी भूमिकेत शिरू नका. अशा वेळी सौम्यपणे आपला दृष्टिकोन पुढे रेटत राहणे अपेक्षित असते. कारण गटचच्रेत कोणाची हार-जीत अपेक्षित नसून एकत्रित सहभागाने शेवटपर्यंत विचारमंथन पुढे सरकवत ठेवणे हा गटचर्चेचा अंतिम हेतू असतो. 
* प्रत्येक वेळी दुसऱ्या उमेदवारांची मते नाकारल्याने निरीक्षकांच्या मनात आपली प्रतिमा नकारात्मक होऊ शकते. इतरांच्या विचारांवर आक्षेप घेताना थेट नकारात्मक न बोलता, प्रश्नार्थक विधाने करून किंवा अंशत: विरोध दर्शवून स्वत:चे मत मांडणे योग्य ठरते. 
* कोणत्याही विषयावर समूहात मतप्रदर्शन करताना जातिवाचक, धर्मवाचक, िलगवाचक विधाने हेतुपुरस्सर टाळणे इष्ट ठरते.
* वाद-प्रतिवादाने चच्रेतील वातावरण तंग झाले असेल तर विषयाला धरून काही हलकीफुलकी विधाने, नर्मविनोद किंवा शाब्दिक कोटय़ा करून चच्रेत प्रसन्नता आणण्याचा प्रयत्न करा. यातून आपली विनोदबुद्धी, चलाखी आणि शांतताप्रिय मनोवृत्ती दिसून येईल.
* चच्रेत मतप्रदर्शन करताना सहभागी असलेल्या सर्वाकडे बघून बोलणे गरजेचे आहे. तसेच चच्रेत फारसा सहभाग घेत नसलेल्या एखाद्या सदस्याला उद्देशून, विषयाशी निगडित प्रश्न विचारून त्याला बोलण्यासाठी उद्युक्त करण्याचे कसबही प्रसंगी दाखवणे आवश्यक ठरते. यातून आपली सांघिक वृत्ती दिसून येते. 
* स्वत:च्या मतांबद्दल आग्रही असणे योग्यच, पण विचारप्रदर्शनात कोठेही आततायीपणा जाणवायला नको. बोलताना आपल्या आवाजाची पट्टी, हातवारे, पायांची हालचाल, बसण्याची पद्धत सर्व काही संयमित असावे.
* काही उमेदवारांना इंग्रजीतून अस्खलित संवाद साधणे कठीण जाते. मात्र, हा न्यूनगंड बाळगत गप्प बसू नका. जमेल तितका इंग्रजीतून संवाद साधण्याचा प्रयत्न करा. 
* विषयांतर टाळण्यासाठी हजरजबाबीपणाने चच्रेला मूळ मुद्दय़ाकडे नेण्याचा प्रयत्न करा.



शेअरबाजार शिकायचाय ?

पैसा हा आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा भाग. भविष्याची तरतूद म्हणून आपण बचत करतो, गुंतवणूक करतो. आज बाजारात गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड, शेअर मार्केट आणि वस्तू मार्केट, सरकारी आणि खासगी बाँड्स असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत हे आपल्याला माहीत आहेच.
शेअरबाजार हा गुंतवणूकदारांसाठी धाडसी पर्याय असतो. अनेकांना त्याबद्दल उत्सुकता असते. परंतु पुरेशी माहिती नसल्यामुळे किंवा ''शेअर बाजारात पैसे गुंतवले म्हणजे पैसे बुडाले,'' अशाप्रकारच्या भीतीमुळे गुंतवणुकीसाठी शेअरबाजाराचा विचार करायला धजावत नाहीत.

शेअरबाजारात उतरण्यापूर्वी त्याचा अभ्यास करण्याची गरज असते. वर्तमानपत्रे, इंटरनेटवरील साइट्स, शेअरबाजाराविषयी माहिती देणारे चॅनेल्स याद्वारे बरीच माहिती मिळू शकते. ऑनलाइन ट्रेडिंग करण्यासाठी http://content.icicidirect.com, http://www.sharekhan.com सारख्या लोकप्रिय आणि विश्वसनीय साइट उपलब्ध आहेत.
शेअरबाजार आणि ऑनलाइन ट्रेडिंग याबद्दलचे व्यावहारिक ज्ञान मिळवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे व्हर्च्युअल ट्रेडिंग. http://virtualstocks.icicidirect.com/ साइटवर तुम्ही व्हर्च्युअल मनी म्हणजेच खोटे पसे वापरून शेअर्सची खोटी खोटी खरेदी-विक्री करू शकता. येथे तुम्ही BSE आणि NSE वर खरेदी-विक्रीची ऑर्डर देऊ शकता. Virtual stock वर खऱ्या लाइव्ह मार्केटप्रमाणे कोणतीही जोखीम नसते. त्यामुळे तुम्ही येथे वेगवेगळे प्रयोग करून बघू शकता आणि तुमचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.
Virtual stock हा ऑनलाइन ट्रेडिंग करण्यासाठी बनवलेला एक खेळ आहे. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे गरजेचे असते. तुमचे अकाऊंट तयार झाल्यावर ट्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला 15 लाख रुपये देऊ केलेले असतात. बाजारभावाप्रमाणे शेअर्सची खरेदी-विक्री करून आपल्याला नफा मिळवता येतो का ते या खेळाद्वारे पाहता येते. तुम्हाला नफा झाल्यास तो नफा तुमच्या ताब्यातील (खोटय़ा खोटय़ा) रकमेत समाविष्ट केला जातो आणि तोटा झाल्यास ती रक्कम कापून घेतली जाते.
तसेच शेअर बाजाराच्या वेळेत म्हणजेच सकाळी 9.15 ते 3.30 ह्या वेळेतच हे व्यवहार करू शकता. या साइटवर काही विशिष्ट कंपन्यांच्याच शेअर्सची खरेदी-विक्री करता येते. त्या कंपन्यांच्या शेअर्सची किंमत लाइव्ह मार्केटनुसार वर-खाली होताना दिसते. मार्केटनुसार तुम्ही तयार केलेल्या पोर्टफोलिओच्या किमतीत होणाऱ्या बदलांचे परीक्षण तुम्हाला करता येते. तुम्हाला या खेळाद्वारे सराव करून कौशल्य प्राप्त करता येते. खरे व्यवहार करताना नवखेपणा कमी होऊन होणाऱ्या चुका प्रत्यक्ष व्यवहारात टाळता येतील.
या साइटवर रजिस्ट्रेशन कसे करायचे, शेअर्सच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार कसे करायचे, पोर्टफोलिओ कसा बघायचा, हे सर्व व्हिडीओरूपात उपलब्ध आहे. FAQ मधे virtual stock बद्दलच्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना साइटवरील विविध लिंक्स cash buy/sell, margin buy/sell इत्यादींची माहिती दिलेली आहे. 
http://www.nse-india.com/NP/nse_paathshaala.htm आणि http://moneybhai.moneycontrol.com/ या अशाच प्रकारच्या व्हर्च्युअल ट्रेडिंगच्या साइट्स आहेत. या साइट्सवरदेखील अकाऊंट उघडण्याच्या संदर्भातील माहिती आणि व्हच्र्युअल ट्रेडिंग करण्याची नियमावली तसेच व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या शब्दांचे अर्थ उपलब्ध आहेत.
मनाली रानडे


कृपया खालील लिंक पहाः

सोमवार, ९ मार्च, २०१५

राज्य व केंद्रीय लोकसेवा स्पर्धा परीक्षाच्या ऑनलाइन सराव परीक्षा


आज ई-लर्निंगचा बोलबाला आहे. प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत इंटरनेट आणि संगणकाचा शिक्षणात वापर वाढताना दिसतो. तरुणाईच्या हातात विविध कंपन्यांच्या टॅबलेट आणि स्मार्टफोनची मॉडेल्स खेळताहेत. क्लासरूम टीचिंगपासून ते परीक्षा देणे या सर्वच क्षेत्रांत ई-लर्निंला मोठाच वाव आहे. स्पर्धा परीक्षाही त्याला अपवाद कशा असतील? आज बँकांच्या परीक्षा ऑनलाइन व्हायला लागल्या आहेत. कदाचित भविष्यात यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षाही होऊ शकतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी ऑनलाइन ई-लर्निंसारखे समर्थ साधन नाही.

केंद्रीय किंवा राज्य लोकसेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तीन टप्पे फार महत्त्वाचे असतात. पहिल्या टप्प्याच्या तयारीत शिकणे, दुसऱ्या टप्प्यात उजळणी आणि तिसऱ्या टप्प्यात सराव करायचा असतो. सरावासाठी मुख्यत: विविध टेस्ट सीरिजचा उपयोग केला जातो. किती सराव परीक्षा सोडवतो यापेक्षा त्या कशा सोडवतो आणि त्याचे विश्लेषण म्हणजे 'परफॉर्मन्स अ‍ॅनॅलिसिस' खूप महत्त्वाचे असते. प्रत्येक विद्यार्थ्यांला या कामगिरीविषयक विश्लेषणावरून स्वत:ची तयारी कुठवर झाली आहे, हे लक्षात येते. त्यानुसार तो अभ्यासाचा आशय, पद्धती आणि तंत्रे यामध्ये योग्य तो बदल करत असतो. बऱ्याच जणांना आपल्या कामगिरीचे विश्लेषण कसे करायचे हे माहीत नसते. ज्यांना माहीत असते त्यांना लागणारा पुष्कळ वेळ यासाठी वापरावा, असे वाटत नाही. विद्यार्थ्यांची ही गरज ओळखून ज्ञान प्रबोधिनीच्या संशोधन विभागाने संगणकावरील एक सॉफ्टवेअर विकसित केले आहे.
www.competeprabodhiniway.com या वेबसाइटवरील हे सॉफ्टवेअर विद्यार्थ्यांना वापरता येईल. शालेय वयापासून देता येणाऱ्या अनेक स्पर्धा परीक्षा (एनटीएस, पीएसए, होमी भाभा, एमपीएससी) या संकेतस्थळावर आहेत. त्यापकी जर एमपीएससी हा पर्याय निवडला तर या परीक्षेसाठी ऑनलाइन मॉक टेस्टला आपण जाऊ शकाल. नोंदणी केल्यानंतर पेपर-१ आणि पेपर-२ च्या दोन छोटय़ा चाचण्या आपल्याला विनामूल्य देता येतील.

कामगिरीचे विश्लेषण

या चाचण्या देताना योग्य पर्याय निवडण्याबरोबरच एखादे उत्तर तुम्ही किती खात्रीने देत आहात असाही पर्याय निवडता येईल. यामुळे 'परफॉर्मन्स अ‍ॅनॅलिसिस'ला मदत होईल. आपल्याला मिळणाऱ्या गुणांचे विश्लेषण हे विषय-घटकानुसार, वेळेनुसार, काठिण्यपातळीनुसार मिळते. एवढेच नव्हे तर प्रश्नपत्रिका सोडवताना बऱ्याचदा आपण ती एकाच वेळी सलग सोडवत नाही. ती वेगवेगळ्या फेऱ्यांमध्ये सोडवतो. प्रत्येक फेरीला लागलेला वेळ, त्यात बरोबर आलेली उत्तरे, चुकलेली उत्तरे हेही कळते. ही सर्व माहिती आलेखांच्या रूपातदेखील स्क्रीनवर येते. त्यामुळे हे सारे विश्लेषण समजून घेणे सोपे जाते. आपल्या तयारीतील बलस्थाने आणि कच्चे दुवे संगणक आपल्याला दाखवतो आणि त्याबरोबरच आवश्यक त्या फीडबॅक कॉमेंट्स स्क्रीनवर येतात. या सूचनांनुसार आपल्याला अभ्यासात काय बदल करायला हवेत ते समजते. सारेच विश्लेषण प्रश्नानुसारही असते, त्यामुळे प्रत्येक प्रश्नाचा बारकाईने विचार करता येतो. याशिवाय ही मॉक टेस्ट हजारो मुले देत असल्याने आपला परफॉर्मन्स इतरांच्या तुलनेत कळण्याची व्यवस्था आहे. ही चाचणी देणाऱ्या विद्यार्थ्यांचे सरासरी गुण, सर्वोच्च गुण आणि कमीत कमी गुण हेही कळतात. त्यामुळे मॉक टेस्टमधले आपले सापेक्ष स्थान कळायला मदत होते.


संपर्काची सुविधा

या सर्व तयारीत तज्ज्ञांची मदत आपल्याला लागत असते. येणाऱ्या अडचणी ई-मेलद्वारे कळवण्याची व्यवस्था या प्रणालीत आहे. त्याला तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन करणारी उत्तरे ई-मेलद्वारे पाठवली जातात. परीक्षार्थीकडून येणाऱ्या फीडबॅक्समधून ही प्रणाली सतत सुधारत जाते हे आणखी एक वैशिष्टय़!
www.competeprabodhiniway.com या वेबसाइटवर जाऊन ज्ञान प्रबोधिनीच्या या ऑनलाइन मॉकटेस्टचा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त उपयोग करता येईल.
        -विवेक पोंक्षे
कृपया खालील लिंक पहाः

http://www.loksatta.com/career-vrutant-news/state-and-union-public-service-online-practice-examination-1078790/

रविवार, ८ मार्च, २०१५

'कामे रखडण्याची चिंता सोडा, बिनधास्त तक्रारी करा'

ऑक्टोबर २०१३ मध्ये पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी  लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा पदभार स्वीकारला आणि खात्याचा चेहरामोहरा बदलून टाकला.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत त्यांनी तब्बल अडीच हजार लाचखोरांना गजाआड केले आहे. आजवरची ही विक्रमी कारवाई मानली जाते. त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत.
नवीन अॅप्लिकेशन काय आहे?
लोकांना अगदी सोप्या पद्धतीने तक्रारी करता याव्यात यासाठी आम्ही हेल्पलाइनबरोबरच आता एक वेब 
vv07अॅप्लिकेशन सुरू केले आहे. त्यामुळे घरबसल्या तक्रार करता येऊ शकते. मोबाइल वा आयपॅडच्या माध्यमातून   www.acbmaharashtra.net या संकेतस्थळावरून या अॅपवर जाता येईल. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत हा अॅप उपलब्ध आहे.
*प्रश्न : यापूर्वी लाचलुचपत  प्रतिबंधक खात्याची स्थिती काय होती?
- राज्यात ३३ जिल्हे आणि साडेतीनशे तालुके आहेत; पण वर्षांला केवळ साडेचारशे ते पाचशे असे सरासरी लाचखोर सापडायचे. म्हणजे तालुक्यातून वर्षांला सरासरी एकच लाचखोर सापडायचा. सगळीकडे उदासीनता होती. खात्यामध्येही एक प्रकारची मरगळ होती. जुनी कार्यपद्धती होती. लोक तक्रार करायला पुढे येत नसत. तक्रार कशी आणि कुठे करायची ते माहीत नसायचं. अधिकारीसुद्धा या खात्याला दुय्यम समजून येथे येण्यासाठी फार उत्सुक नसत. भ्रष्टाचार तर होतोय, मग लोक पुढे का येत नाहीत, हा प्रश्न मला भेडसावत होता. तेव्हाच मी या खात्याची भयानक स्थिती ओळखून आमूलाग्र बदल करण्यास सुरुवात केली.
*प्रश्न : पहिला बदल काय केला?
- सुरुवातीला मी सर्व जिल्हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी जोडले. त्यामुळे राज्यभरातील खात्याच्या सर्व कार्यालयांमध्ये समन्वय सुरू झाला. कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवून त्यांना त्यांच्या कामासाठी प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली.
*प्रश्न : तक्रारदारांची संख्या कशी वाढवली?
- लाचखोरांना पकडायचे, तर तक्रारदार मोठय़ा संख्येने पुढे यायला हवेत. पूर्वी लोकांना खात्यापर्यंत पोहोचण्यासाठी दिव्य करावे लागायचे. एखादा आला तर अधिकारी त्याला गोंधळवून टाकत. तक्रार करण्याची प्रक्रिया किचकट होती. त्यामुळे आम्ही लोकांपर्यंत जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही तक्रार दाखल करण्याची अत्यंत सोपी पद्धत सुरू केली. ती म्हणजे १०६४ क्रमांकाची टोल फ्री हेल्पलाइन सुरू केली. राज्यभरातून कुणीही अगदी २४ तास केव्हाही एका फोनवर तक्रार नोंदवू शकतो. तक्रार केल्यावर कारवाई करून संबंधित लाच मागणाऱ्या व्यक्तीला पकडले जाते, हा विश्वास निर्माण केला. सहा महिन्यांपूर्वी ही हेल्पलाइन सेवा सुरू झाली आणि तब्बल चार हजार तक्रारी त्यावर आल्या.
*प्रश्न : लोकांच्या दारात पोहोचण्याची कुठली नवीन पद्धत सुरू केली?
- आम्ही सतत जनजागृती करत लोकांना तक्रार करण्याचे आवाहन करतच असतो; परंतु लोकांनी आमच्याकडे येता कामा नये, हे नवीन तत्त्व अवलंबले. त्यामुळे आमचे अधिकारी आणि कर्मचारी साध्या वेशात सरकारी कार्यालयांमध्ये फिरतात. कामे न झाल्याने, लाच मागितल्याने लोक त्रस्त असतात. त्यांच्याशी संवाद साधतो. कुणी लाच मागितली? काही अडचण आहे का? हे विचारतो आणि तात्काळ तक्रार नोंदवून घेतो आणि लगेच सापळा लावून कारवाई करतो.
*प्रश्न : लाचखोरांना पकडण्याचे विक्रमी प्रमाण कसे गाठले?
- लाच मागणारे अधिकारी हुशार असतात. लाच मागताना आणि स्वीकारताना ते सावध असतात. त्यांना पकडण्यासाठी आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. लाच मागणाऱ्यांचे संभाषण ध्वनिमुद्रित (रेकॉर्डिग) करू लागलो. एखादा अधिकारी स्वत: लाच घेत नाही, तर तो खासगी इसमांना पाठवतो; परंतु आम्ही त्या खासगी व्यक्तीला पकडल्यानंतर ज्याने लाच मागितली त्यालाही अटक करतो. त्यामुळे मी लाच स्वीकारली नाही, असा त्याचा बचावात्मक पवित्रा गळून पडतो.
*प्रश्न : लाचखोरांवर जरब कसा बसवला?
- एखाद्याला लाच घेताना पकडले जायचे ते चार भिंतींत. नंतर तो जामिनावर सुटायचा आणि उजळ माथ्याने वावरायचा. त्यामुळे त्याचा चेहरा सर्वासमोर आणण्याची गरज होती. आम्ही प्रत्येक लाचखोराचे फोटो काढून ते प्रसिद्ध करायला सुरुवात केली. त्याचे फोटो आम्ही आमच्या संकेतस्थळावर आणि फेसबुकवर टाकतो. लाचखोरांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी माध्यमांचे सहकार्य घेतो. सध्या  व्हॉटसअ‍ॅप, ई-मेलच्या माध्यमातून राज्यभरातल्या पत्रकारांना तात्काळ माहिती पोहोचवतो. सापळा लावला, की काही वेळातच राज्यभरातील प्रसारमाध्यमांना ई-मेलद्वारे त्याची सविस्तर माहिती देतो. सचित्र प्रसिद्धी मिळाल्याने त्यांची बदनामी होते. याशिवाय त्याच्या घराची झडती घेतो, त्याने जमविलेल्या मालमत्तेची चौकशी करतो. ती बेहिशेबी असेल तर जप्त करतो. त्यामुळे आत दोन-पाच हजार रुपयांची लाच मागितली, तर जमवलेली सगळी संपत्ती जप्त होईल, ही भीती त्याच्या मनात असतेच आणि त्याच्यावर जरब बसत असते.
*प्रश्न : न्यायालयात लाचखोरांची प्रकरणे टिकत नाहीत हे खरे आहे का?
- पूर्वी एखादा सापळा लावताना त्यात त्रुटी असायच्या. पारंपरिक पद्धतीने पंचनामा केला जायचा. त्यामुळे आता आम्ही तांत्रिक पुरावे गोळा करण्यावर भर दिला आहे. तक्रारदाराचा जबाब व्हिडीयो चित्रणद्वारे नोंदवून घेतो. सापळा लावताना, घराची झडती घेताना त्याचे चित्रण करतो. सर्व पुरावे डिजिटली जतन करतो आणि तेच डिजिटल पुरावे न्यायालयात सादर करतो. ते भक्कम पुरावे असतात. त्यामुळे आताच्या सापळ्यात अडकलेले लाचखोर सुटणे कठीण होणार आहे.
*प्रश्न : पण लाचखोरांचे खटले वर्षांनुवर्षे प्रलंबित असतात?
- लाचखोरांची प्रकरणे न्यायालयात वर्षांनुवर्षे प्रलंबित राहत असत, हे खरे आहे; पण त्यासाठी आम्ही सरकारकडे पाठपुरावा केला होता. अखेर सरकारने उच्च न्यायालयाला निर्देश दिले. त्यानुसार आता उच्च न्यायालयाने प्रत्येक अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांना वर्षांला २४ प्रकरणे निकालात काढण्याचे आदेश दिले आहेत. सध्या मागील काही वर्षांच्या खटल्यांची सुनावणी सुरू आहे; पण लवकरच हे खटले निकाली निघू शकतील.

*प्रश्न : नागरिकांना काय आवाहन कराल?
- आम्ही कारवाई करतो. त्यात वाढ होत राहील; परंतु त्या त्या संबंधित विभागानेसुद्धा भ्रष्टाचार होऊ नये यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. लोकांनी निर्भयपणे पुढे आले पाहिजे. तक्रार केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून दबाव येईल, आपली कामे होणार नाहीत, अशी भीती लोकांमध्ये असते. त्यामुळे ते तक्रार करायला पुढे येत नाहीत; पण मी विश्वास देतो की, लोकांनी लाचखोरांविरोधात बिनधास्त तक्रार करावी. ज्या कामासाठी तुमच्याकडे लाच मागितली आहे, ते काम करून देण्याची जबाबदारी आमची राहील.
_सुहास बिऱ्हाडे

कृपया खालील लिंक पहाः

http://www.loksatta.com/vishesh-news/an-interview-with-pravin-dixit-anti-corruption-bureau-chief-1078878/

"शोध" मुंबई रेल्वे पोलीसांनी तयार केलेली वेबसाईट

नमस्कार, "शोध" मुंबई रेल्वे पोलीसांनी तयार केलेली वेबसाईट आहे. हरवलेल्या व्यक्ती, अपघातात जखमी. बेवारस अपमृत्यू प्रकरण आणि सापडलेली लहान मुले, अगर स्वतः बद्दल माहीती न देवू शकणारे
यांचे शोधात अत्यंत उपयोगी


पोलीस अधिकारी आणि ग्रुप यांना पाठवा.

शनिवार, ७ मार्च, २०१५

वास्तुदर्पण -गृहसुरक्षितता आणि सजावट

घराला घरपण देणारी आधुनिक सजावट करून नुसते भागत नाही, तर त्या घराची आणि त्या घरात राहणाऱ्या प्रत्येकाची सुरक्षितता विचारात घेण्याच्या दृष्टिकोनातून काही नावीन्यपूर्ण उपाययोजना केलेल्या असणे आवश्यक असते. सद्य:स्थितीत घराच्या बाबतीत सर्वप्रथम सुरक्षितता महत्त्वाची असल्याचे आपण विसरून चालणार नाही. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना, सोयीसुविधा घराच्या मुख्य दरवाजापासून घरातील अत्यंत जोखमीच्या आणि मौल्यवान जिनसा ठेवण्याच्या जागेपर्यंत अभ्यासपूर्वक विचारात घ्यायला हव्यात. घराचे सौंदर्य आणि अंतर्बाहय़ सजावट हे जसे महत्त्वाचे असते तसेच संपूर्ण घराची, घरातील मालमत्तेची आणि घरातील कुटुंबीयांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक असते.
गृहसुरक्षितता आणि सजावट 
आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेकदा दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून आपल्या कुटुंबासाठी आणि एकूणच आपल्या घरासाठी पैसे मिळवण्यासाठी धडपडत असतो. पै पै जमवलेली जमापुंजी आपण सुरक्षित ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो. मिळवलेल्या पैशाचे सुख आणि समाधान जसे आपल्याला हवे असते तसेच त्याची सुरक्षिततादेखील ठेवणे अनिवार्य असते. आपल्या मालमत्तेची गृह सजावट करत असताना शास्त्रीय दृष्टिकोनातून सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याचे नेमके महत्त्व काय आणि त्या कोणत्या प्रकारे करता येऊ शकतात, याचा अभ्यासपूर्वक विचार करणे जरुरीचे आहे. घराच्या सुरक्षाव्यवस्थेची गरज ही काही दिवस आपण घराबाहेर, अन्य ठिकाणी अथवा बाहेरगावी असल्यामुळे घर बंद राहणार असेल तर जशी असते तशीच गरज आपण घरात असतानादेखील तितकीच असते.  
प्रवेशद्वारावरील सुरक्षा योजना 
हल्ली नव्याने बांधलेल्या अनेक इमारतींमध्ये प्रत्येक घराच्या आणि त्या घरातील कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना राबवलेल्या असतात. त्या जर पुरवल्या गेल्या नसतील तर निश्चितच आपण त्यांचा अभ्यासपूर्वक विचार करून वापर केला पाहिजे. घराच्या मुख्य दाराबाहेर अधिक सुरक्षेसाठी अजून एक दार अर्थात एम.एस. सेफ्टी डोअर अनेक ठिकाणी बसवले जाते; परंतु त्याचबरोबर त्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वयित होणे अधिक महत्त्वाचे असते. सीसी टीव्ही कॅमेरा मुख्य दरवाजाच्या बाहेर लावलेला असेल तर निश्चितच आपण घरात असलो अथवा नसलो तरीही आपल्याकडे किंवा घरापाशी कोण येऊन गेले हे कधीही पाहता येऊ  शकते. ही अधिक सोयीस्कर, प्रचलित, माफक खर्चात होणारी, अनेक फायदे देणारी आणि म्हणूनच अनेकांना पसंत पडलेली सुरक्षा योजना आहे. हल्ली या योजनेचा वापर आपल्या मोबाइलवरदेखील आपण करू शकत असल्याने कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही वेळी घरापाशी घडणाऱ्या घडामोडी आपण मोबाइलवर बघू शकतो. 
प्रवेशद्वारावरील सुरक्षा योजनेचे विविध प्रकार
प्रवेशद्वारावरील सुरक्षा योजनेचे विविध आधुनिक प्रकार सध्या बाजारात उपलब्ध आहेत. डोअर कॅमेरा, सीसी टीव्ही कॅमेरा, अ‍ॅक्सेस कंट्रोल लॉक, बायोमेट्रिक लॉक, इंटरकॉम, टेलिकम्युनिकेशन सिस्टम, डिजिटल लॉक्स, नंबरिंग लॉक्स, रिमोट कंट्रोल लॉक्स, डोअर कॅमेरा विथ फोन, रिमोट अ‍ॅक्सेस कॅमेरा, कॉम्प्युटराइज्ड मेसेज सिस्टम, मेसेज अलर्ट सिस्टम, सिक्युरिटी सायरन, स्मोक डिटेक्टर, फायर अलार्म सिस्टम अशा विविध प्रकारांतून आपल्या घराला साजेशी आणि आपल्याला आर्थिकदृष्टय़ा परवडेल अशी निदान एखादी तरी सुरक्षा योजना आपण कार्यान्वयित करून घ्यावीच.  
अंतर्गत संरचनेतील सुरक्षा व्यवस्था 
घरातून बाहेर पडल्यानंतर जर घरातील एअरकंडिशनर, टय़ुबलाइट, फॅन अथवा एखादे किचनमधील इलेक्ट्रिकल अथवा इलेक्ट्रॉनिक उपकरण सुरू राहिले असेल, तर ते घराबाहेर असताना रिमोटच्या साहाय्याने बंद करता येते. त्यामुळे निश्चितच आपण एखादा अनर्थ टाळू शकतो. घरातून बाहेर पडण्यापूर्वीच आपण योग्य ती काळजी घेतली, तर प्रश्नच निर्माण होणार नाहीत. घरातील अंतर्गत संरचना करत असताना अनेक बाबींचा विचार करून सुरक्षिततेच्या दृष्टीने काही उपाययोजना करता येऊ  शकतात. सर्वप्रथम संरचना करताना त्या घरात हवा अधिकाधिक खेळती राहिली पाहिजे, हा विचार होणे जरुरीचे असते. संकटसमयी याचा उपयोग अधिक होतो. घरातील फर्निचर हे अधिकतर लाकूड आणि प्लायवूड वापरूनच केले जाते. अनेकदा वायरिंगचे काम करताना त्यामुळे विशेष काळजी घेणे जरुरीचे असते. आपल्या घरात अत्यंत महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी निदान एखादे छोटेसे फायरप्रूफ फायलिंग कॅबिनेट (एफआरएफसी) असावे. घरामध्ये कोणत्याही कारणामुळे आगीचा धोका निर्माण झाला, तर त्वरित काही जुजबी उपाययोजना उपयोगात आणणे उपयुक्त ठरते. विजेच्या उपकरणांची निवड करत असताना विशेष काळजी घ्यावी लागते. 
घरातील सुरक्षेसाठी उपलब्ध विविध पर्याय
घराच्या अंतर्गत सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विजेची उपकरणे तसेच स्वयंपाकघरातील गॅस या दोन्ही बाबींमुळे आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते. अनेकदा या कारणांमुळेच काही अपघात घडल्याचे आपण ऐकत असतो. तत्सम घटना घडल्याच, तर काही त्वरित उपाययोजना करण्यासाठी आपले घर आणि त्या वेळी घरात उपस्थित असणारी व्यक्ती सज्ज असली पाहिजे तसेच त्या परिस्थितीचा सहजरीत्या सामना करू शकली पाहिजे. गॅसच्या बाबतीत आपण स्वत: आवश्यक ती काळजी जरूर घेऊ  शकतो; परंतु विजेच्या उपकरणांची काळजी घेणे हे त्यासंबंधी माहिती असेल तरच शक्य होऊ  शकते. गृहसजावट करताना अनेकदा विद्युतीकरण आणि लाकडी फर्निचर यांचे काम एकत्रितपणे केले जात असते. अशा वेळेला वापरल्या जाणाऱ्या मालाची निवड नीट केलेली असणे आवश्यक असते.  
प्रगत तंत्रज्ञान वापरून बनवलेली सुरक्षेची उपकरणे 
सध्या बाजारात प्रगत तंत्रज्ञान वापरून बनवलेली संगणकीकृत सुरक्षिततेची विविध उपकरणे उपलब्ध आहेत. काही उपकरणांचा वापर आपण आपल्या मोबाइलद्वारे कोठूनही करू शकतो. क्लोज सर्किट टीव्ही कॅमेराच्या साहाय्याने आपल्या मोबाइलवरदेखील आपण घरातील अथवा प्रवेशद्वाराच्या ठिकाणच्या हालचाली आणि घडणाऱ्या  घडामोडी बघू शकतो. अलार्म सिस्टमदेखील प्रवेशद्वाराला बसवता येऊ  शकते. स्मोक डिटेक्टर, फायर अलार्म अशा आधुनिक वस्तूदेखील हल्लीच्या दिवसांमध्ये गृहसजावट करताना विचारात घेणे उपयुक्त ठरते.   
अशा अनेकविध बाबींचा अभ्यासपूर्वक विचार करून आपल्या घराची सुरक्षिततेच्या बाबतीत उपाययोजना करावी लागत असल्यामुळे एकूणच अंतर्गत सजावट करण्याचे स्वरूप मर्यादित न राहता व्यापक आणि अत्यंत आधुनिक होऊ  शकते. सुरक्षितता ही काळाची गरज आहे हे लक्षात घेऊन केलेले गृहसजावटीचे काम निश्चितच आपले निराळेपण आणि सतर्कता सिद्ध करू शकणार आहे.     
शैलेश कुलकर्णी -sfoursolutions1985@gmail.com
इंटिरीअर डिझायनर

कृपया खालील लिंक पहाः

http://www.loksatta.com/vasturang-news/home-safety-and-decorations-1078549/?nopagi=1