बुधवार, १२ ऑक्टोबर, २०१६

DATE: 12-10-16: FROM ASHOK D VHATKAR, PUNE:

*आज १२ ऑक्टोबर*
*आज चौफेर काव्यलेखनाने रसिकांना आनंद देणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री मा.शांता शेळके यांची जयंती*
जन्म :- १२ ऑक्टोबर १९२२
पुण्याच्या हुजूरपागा शाळेतून शालेय शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातच सर परशुरामभाऊ महाविद्यालयात मा.शांता शेळके यांनी पुढील शिक्षण घेतले. एम्.ए.च्या परीक्षेत मराठी हा विषय घेऊन तात्यासाहेब केळकर सुवर्णपदक त्यांनी मिळविले. त्यानंतर मुंबई येथे अल्पकाळ आचार्य अत्रे यांच्या नवयुग साप्ताहिकात नोकरी केली. पुढे नागपूर आणि मुंबई येथील महाविद्यालयांतून मराठीचे अध्यापन केले.
मराठी, संस्कृत आणि इंग्रजी या तिन्ही भाषांवर मा.शांताबार्इंचं प्रभुत्व होतं. वाङ्मयाचे सगळेच प्रकार जरी त्यांनी हाताळले असले तरी गीतकार म्हणून त्या विलक्षण लोकप्रिय झाल्या आणि मराठी माणसांच्या मनापर्यंत पोहोचल्या. एखाद्या गीतातून भावनाट्य चित्रीत करण्याचं शब्दकौशल्य त्यांच्या अनेक गीतांतून होते. विविध क्षणातील वेगवेगळे तरंग त्यांच्या तरलतेसह टिपणं त्यांना सहज जमायचं. गाण्यातलं मराठीपण त्यातल्या सुगंधासह जपण्यासाठी अस्सल ग्रामीण शब्द गाण्यात घालताना त्यांची प्रतिभा कचरली नाही. सखे, सये अशा संबोधनातून ते घरच वाहू लागयतं. उनाड मनाच्या अवखळ प्रियकराचा अल्लडपणा, त्याचं प्रेयसीला चिडवणं हे सगळं त्या मोठ्या मिश्कीलपणे कवितेत व्यक्त करत. त्यांनी अनेक गीतांतून स्त्रीमनाच्या छटा त्यातील स्वाभाविकतेसह व्यक्त केलेल्या आहेत. प्रियकराच्या मनातील विरह, प्रीती, धैर्य, बेछूटपणा यांचाही प्रत्यय देणारी त्यांची अनेक गाणी आहेत. कोणत्या तरी दाहक वेदनेचा चटका बसून संपूर्ण आयुष्यालाच एक रिक्तता यावी, अशी त्यांची गाणी आजही लोकप्रिय आहेत. शांताबार्इंची भाषाशैली आणि काव्यशैली पहिल्यापासूनच ओघवती, लालित्यपूर्ण; पण त्याचं सगळं श्रेय त्या आचार्य अत्रे यांना देत. ‘नवयुग’मध्ये नोकरी करत असताना प्र.के अत्रे एकदा त्यांना म्हणाले होते, ‘शांता, तुला शब्दांचा सोस फार आहे. लहान मुलं ज्याप्रमाणं रंगीबेरंगी खडे गोळा करतात त्याप्रमाणं तू शब्द गोळा करतेस. बोलण्यातला ओघ आपल्या लेखनात आला पाहिजे.’ अत्र्यांचं हे वाक्य त्यांनी लक्षात ठेवलं आणि आपली संस्कृतप्र्रचुर भाषाशैली बदलली.
कविता, कथा, कादंबरी, व्यक्तिचित्रे, बालसाहित्य,चित्रपटगीते,समीक्षा, आत्मकथन, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत लेखन शांता शेळके केलेल्या वृतपत्र, संपादक तथापि कवयित्री आणि गीतकार म्हणून आजच्या पिढीतही विशेष प्रसिद्ध आहेत. बालसाहित्याच्या जगातही त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. अनेक नाटके, ध्वनी मुद्रिका, चित्रपटांसाठी त्यांनी विपुल गीतलेखन केले. ’तोच चंद्रमा’, ’कळ्यांचे दिवस फुलांच्या राती’, ’चित्रगीते’ ही त्यांची गीतसंकलने प्रसिद्ध आहेत. शांताबाईंनी हिंदी, इंग्रजी, संस्कृत या भाषांमधील साहित्याचे अत्यंत ओघवत्या शैलीत मराठी भाषांतर केलेले आहे. महाकवी कालिदासाचे ’मेघदूत’, ’चौघीजणी’ त्यांच्या कवितांबरोबरच त्यांचे गद्यलेखन सुद्धा खूप सुंदर आणि मनाला पकडून ठेवणारे आहे. वाचायला घेतले की सोडवत नाही त्यांची पुस्तके. त्यांचे गुलमोहोर, कावेरी, बासरी, इत्यादी कथासंग्रह तर ओढ, धर्म, अशा कादंब-या प्रसिद्ध आहेत. धूळपाटी नावाचे त्यांचे आत्मचरित्र सुद्धा खूप सुंदर आहे. स्वतःच्या लहानपणाबद्दलच्या त्यातील आठवणी तर आपल्याला हेवा करायला लावतात. तसेच ’पावसाआधीचा पाऊस’, ’आनंदाचे झाड’, ’वडीलधारी माणसे’ हे त्यांचे ललित लेख संग्रह खूपच गाजलेले आहेत. भाषांतर हे शांताबाईंच्या दृष्टीनी फक्त अर्थार्जनाचे साधन नव्हते तर स्वतःच्या भाषाभ्यासातील भर टाकणारेपण होते. त्यातील अत्यंत गाजलेले भाषांतर म्हणजे जपानी हायकुंचे. जपान मधील हा काव्यप्रकार त्यांनी अनुवादित करून मराठी रसिकांच्या पुढे ’पाण्यावरच्या पाकळ्या’ नावानी ठेवला आणि तो लोकांना इतका आपला वाटला की लोक आता मराठी हायकू असंच म्हणतात.
जरी अनेक साहित्य प्रकार समर्थपणे हाताळले असले तरी, कविता लेखन हा शांताबाईंच्या विशेष आवडीचा साहित्य प्रकार. ’असेन मी नसेन मी’ , ’वर्ष’, ’रूपसी’, ’गोंदण’, ’अनोळख’, ’जन्माजान्हवी’ ही त्यांच्या कविता संग्रहांची काही नावे. ’मुक्ता आणि इतर गोष्टी’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह. ’स्वप्नतरंग’ ही त्यांची पहिली कादंबरी; तर ’शब्दांच्या दुनियेत’ हा त्यांचा पहिला ललितलेखसंग्रह. त्यांनी उत्तम अनुवादही केले. “मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश” सारखी भक्ती गीते लिहिली. “शूर आम्ही सरदार” आणि “मराठी पाऊल पडते पुढे” या सारख्या चित्रपट गाण्यांनी अनेकांना स्फुरण दिलंय. मा.शांता शेळके म्हणजे सगळ्या लहान मुलांच्या लाडक्या आजी. नातवंडांसाठी "किलबिल किलबिल पक्षी बोलती", "विहीणबाई विहीणबाई" अश्या अनेक छान छान कविता, बालगीतं लिहिणा-या. मा.शांता शेळकेंनी साधेपणा आयुष्यभर जपला. निसर्गाविषयी मात्र त्यांना विलक्षण ओढ होती. निसर्गाच्या सांनिध्यात त्या तहानभूक विसरून तासन्तास बसत. निसर्ग हाच त्यांचा खरा सखा सोबती होता. निसर्गाच्या अनेक छटा त्यांनी त्यांच्या गीतांतून व्यक्त केल्यात. शांता शेळके यांनी अनेक वर्षे नाटक आणि चित्रपटांच्या सेन्सॉर बोर्डावर काम केले. आळंदी इथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना मिळाला होता. *मा.शांता शेळके* यांचे ६ जून २००२ रोजी निधन झाले. आपल्या समूहातर्फे *मा.शांता शेळके* यांना आदरांजली.
*संजीव वेलणकर पुणे.*
*९४२२३०१७३३*
संदर्भ :- marathiworld.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा